इंदुरीकर समाजात पुरुषसत्ता बिंबविण्याचा प्रयत्न करत आहेत : अंनिस

blank

पुणे : समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी होते असे वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु असतानाच त्यांनी या सर्व वादावर काल रात्री केलेल्या किर्तनात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“दोन तासांच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन” असं इंदुरीकर म्हणाले आहेत. “यूट्यूबवाले काड्या करतात. यूट्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु सांगतो चॅनल संपतील पण मी नाही”, असंही इंदुरीकर महाराज म्हणाले. या किर्तनात इंदुरीकरांनी सर्व प्रकरणाचा रोष यूट्यूब चॅनलवर व्यक्त केला.

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारत २१ शतकाकडे वाटचाल करत आहे. आपण इतके प्रगत्शील शोध लावत असताना इंदुरीकर प्रबोधनातून स्त्री पुरुष समानता नाही तर समाजात पुरुषसत्ता बिंबविण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच इंदुरीकरांनी धर्मग्रंथांमधील जे संदर्भ दिले आहेत. ते प्रबोधनातून मांडण्याची गरज नाही. आपल्या प्रबोधनातून ते महिलांबाबत अपमानस्पद बोलत असतात, महिलांना त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य नाही का, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला आहे.

तसेच इंदुरीकर त्यांच्या प्रबोधनातून तसेच त्यांनी गर्भलिंग कायद्याविरोधात जे विधान केले आहे. त्या विधान विरोधात तर त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मुलन समिती गुन्हा दाखल करणार असल्याचे हि त्यांनी यावेळी सांगितले.