‘या’ कारणामुळे इंदुरीकर महाराजांच्या खटल्यातून सरकारी वकिलांची माघार!

indurikar maharaj d

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : मागील काही दिवसांपूर्वी अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराजांच्या विरोधात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल झाला होता. दरम्यान, संगमनेरच्या सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील सरकारी वकील ॲड.बी.जी.कोल्हे यांनी आपले वकील पत्र मागे घेतले आहे. या खटल्यातील इंदुरीकरांच्या वकिलांशी सरकारी वकिलांचा भावाच्या खटल्यानिमित्त संबंध येत असल्याचा आरोप झाल्याने कोल्हे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता यासाठी नवीन सरकारी वकिलांची नियुक्ती करावी लागणार आहे.

इंदुरीकर महाराज यांच्या वादग्रस्त विधानाचे व्हिडिओ सोशल माध्यमांवर झळकले होते. या विधानामुळे त्यांच्याविरोधात घुलेवाडीच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर भवर यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये १९ जून रोजी संगमनेर न्यायालयात खटला दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील बी.जी.कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर इंदुरीकरांतर्फे ॲड.के.डी.धुमाळ तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे रंजना गवांदे बाजू मांडत आहेत. सर्वांना लेखी युक्तिवाद सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. मागील तारखेला हे काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे सुनावणी २५ नोव्हेंबरला ठेवण्यात आली आहे.

मागील तारखेला कोर्टाचे कामकाज झाले नसले तरी कोर्टाबाहेर काही घडामोडी पहायला मिळाल्या होत्या. या प्रकरणातील सरकारी वकिलांच्या भावाविरुद्ध संगमनेरच्याच न्यायालयात एक खटला सुरू आहे. इंदुरीकरांची बाजू मांडणारे सरकारी वकिलाच्या भावाचाही खटला चालवित असल्याचे उघड झाले होते. न्यायिक तत्वानुसार असे चालत नाही. त्यामुळे आता सरकारी वकील कोल्हे यांनी या खटल्यापासून स्वत:ला बाजूला करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या