इंद्रायणी एक्सप्रेस होणार पुन्हा सुरू

पुणे – पुणे ते सोलापूर दरम्यान धावणारी इंद्रायणी (इंटरसिटी) सुपरफास्ट एक्स्प्रेस गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याने रेल्वेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाल्याची आकडेवारी समोर आली आहे. वाशिंबे व जेऊरदरम्यान लोहमार्गाच्या कामाकरिता ही गाडी १ नोव्हेंबरपासून बंद ठेवण्यात आली. ६ मार्चपासून पुन्हा एकदा ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

bagdure

या गाडीने दररोज सुमारे दोन हजार प्रवासी प्रवास करतात. रोज पुणे-सोलापूर व सोलापूर-पुणे या दोन्ही दिशांना मिळून सुमारे पाच लाख रुपयांचे उत्पन्न बुडाल्याची आकडेवारी समोर आली आहे.वाशिंबे व जेऊरदरम्यानचे अंतर सुमारे २० किलोमीटर असून या पट्ट्यातील लोहमार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता तब्बल चार महिन्यांहून अधिकचा कालावधी लागल्याचे दिसून आले. या कामाकरिता कमी मनुष्यबळाचा वापर करण्यात आल्याने काम रखडले, असा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे. ही गाडी चार महिने बंद ठेवण्यात येणार आहे, असे रेल्वेने आधीच जाहीर केले असले तरी देखील जादा मनुष्यबळ लावून मुदतीपूर्वीच काम पूर्ण करता येणे सहज शक्य होते, अशी चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. कोणतीही रेल्वे एवढे दिवस बंद ठेवण्यात आल्याची बहुदा देशातील एकमेव घटना असेल, असे मत रेल्वे तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. इंद्रायणी एक्स्प्रेस बंद न ठेवता अन्य मार्गे वळविली असती तर प्रवाशांची गैरसोय टळली असती व रेल्वेचे उत्पन्नदेखील घटले नसते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

यामुळे गेली चार महिने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. पुण्याहून सोलापूरला जाण्याकरिता इंद्रायणी एक्स्प्रेस ही सुपरफास्ट गाडी प्रवाशांची लाडकी असून मुंबईतून ती पुण्यात सकाळी ९.१५ वाजता दाखल होते व पुण्यातून सकाळी ९.३० वाजता सुटून सोलापूर येथे दुपारी १.३० वाजता पोहोचते. केवळ चार तासात सोलापूरला ही गाडी पोहोचत असल्याने सर्वांच्याच पसंतीला ती उतरली आहे. मार्चमध्ये ती पुन्हा धावण्यास सज्ज होणार आहे.

Comments
Loading...