क्रीडाविश्वात हळहळ! भारताचे महान हॉकीपटू बलबीर सिंग यांचे निधन

hockey player Balbir Singh

मोहाली : दिग्गज हॉकीपटू आणि तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे बलबीर सिंग सीनियर यांचं निधन झालं आहे. बलबीर सिंग 95 वर्षांचे होते. गेल्या दोन आठवड्यापासून ते विविध प्रकारच्या आजारांशी दोन हात करत होते. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांना न्यूमोनियावर तब्बल १०८ दिवस उपचार घेतल्यानंतर रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर बलबीर सिंग यांना ८ मे रोजी मोहलीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

बलबीर सिंग यांचा जन्म 31 डिसेंबर 1923 रोजी पंजाबच्या हरिपूर खालसामध्ये झाला होता. बलबीर सिंग सीनियर यांच्या कुटुंबात त्यांची मुलगी सुशबीर आणि 3 मुलं कंवलबीर, करणबीर आणि गुरबीर आहेत.

ऑलिम्पिकच्या इतिहासात गोल्डन मॅन म्हणून ओळख :

बलबीरसिंग सीनिअर यांनी लंडन (1948), हेलसिंकी (1952) आणि मेलबर्न (1956) ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला तीन सुवर्णपदक मिळवून दिले. हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये नेदरलँड्सविरुद्ध 6-1ने जिंकलेल्या सामन्यात बलबीरसिंग यांनी पाच गोल केले आणि अद्याप हा विक्रम अबाधित आहे. १९५६ साली मेलबर्न ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण स्पर्धेत ३८ गोल केले आणि विशेष म्हणजे प्रतिस्पर्धा संघाला भारताविरूद्ध एकही गोलची कमाई करता आली नाही. त्यांनी भारतीय हॉकी संघाचे कर्णधारपददेखील भूषवले आहे. ते 1975 च्या वर्ल्डकप जिंकणार्या भारतीय हॉकी संघाचे व्यवस्थापकही होते.

बलबीरसिंग सिनिअर हे केवळ भारतच नव्हे तर जगातील दिग्गज खेळाडू होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने निवडलेल्या आधुनिक ऑलिम्पिक इतिहासातील 16 महान ऑलिम्पियन खेळाडूंमध्ये बलबीर यांचा समावेश होता. हॉकी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

#व्यक्तिविशेष : खा.छत्रपती संभाजीराजे भोसले ….दीनदुबळ्यांसाठी लोकहितासाठी, सर्वसामान्यांसाठी झटणारा खरा लोकनेता

लडाखमध्ये भारत-चीन LOCवर मोठा तणाव, दोन्ही देशांनी केले सैन्य तैनात

बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकावर कोसळला दुःखाचा डोंगर