कोट्यावधी कमकुवत , कुपोषित बालकांच्या भारत देशा!

India's billions of weak, malnourished children!

प्रा. डॉ.सुधीर गव्हाणे – लहान मुलं ही कोणत्याही देशाचं भवितव्य असतात. ज्या देशातील मुलं निरोगी नि आनंददायक जीवन जगू शकतात. ज्या देशातील मुलं सुरक्षित तेथील भावी समाजही सुरक्षित राहतों. कोणत्याही देशातील अर्थव्यवस्थेपेक्षा त्या देशातील मनुष्यव्यवस्था अधिक मोलाची असते. मनुष्यव्यवस्था म्हणजे त्या देशातील मानवी भांडवल ( ह्युमन कँपीटल)होय. शेवटी अर्थव्यवस्थेला शक्ती देणारी संपत्ती कोण निर्माण करतं तर माणसचं . माणसे संपत्ती तयार करतात . माणसे उद्योग उभा करतात , त्यातून रोज़गार निर्माण होतों. शास्त्रज्ञ संशोधन करतात व त्यातून नवे औद्योगिक क्षेत्र तयार होते. जीवन सुखमय होते. त्यासाठी शक्तिशाली मानवी भांडवल हवे आणि असे मानवी भांडवल उभे राहतें ते आजच्या बालकांच्या गुणवत्तेवर ! आरोग्यवान, ज्ञानवान नि गुणवान बालकं ज्या समाजात असतात , त्या समाजाचे भवितव्य सुरक्षित राहतें.मग भावी समाज घडविणारी बालकांची पिढी आपण कशी घडवितो नि जपतो ?की उध्वस्त करतो? भारतातील बालकांची अवस्था काय आहे? त्यांना आपण निरोगी नि आरोग्यमय जीवन तसंच दर्जेदार शिक्षण देतो काय? त्यांना बालपणापासूनच मुक्त आनंददायक वातावरण बहाल करतो का? बालकांचे हक्क आपण त्यांना देतो का? बालकांचा विकास आपल्या देशातील विकास योजनांच्या अग्रक्रमात आहे का? “सबका विकास “यामध्ये बालकांचा विकास कुठे आहे? त्याचा विचार केलाय का? या सर्व प्रश्नांचे उत्तर काय ? याचाच शोध या लेखात धेतो आहे. जागृत वाचकांना हा लेख विचार करायला बाध्य क़रेल अशी आशा आहे.
काय आहे भारतीय बालकांची अवस्था ?
भारताची लोकसंख्या १३० कोटीहून अधिक आहे.ही जगातील लोकसंख्येच्या १७.५% आहे. सर्व आफ़्रिका खंडात एकूण ५२ देश आहेत व त्यांची एकत्रित लोकसंख्या १२० कोटी आहे. एकटा भारत देश आफ़्रिका खंडापेक्षा मोठा आहे. जगातील ० ते ४ वर्ष वयोगटातील एकूण बालकांच्या २०% बालक भारतात आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल भारतात जन्मलेली ४३% मुले ही जन्मत: अल्पवजनी असतात आणि ४८ % मुलांची वाढ खुंटलेली आहे. पुरेशी पौष्टिक अन्नद्रव्यं न लाभल्याने कुषोषणाने ग्रस्त झालेली व त्यांची वाढ खुंटलेली आहे अशी बालके भारतात ६ कोटी १० लाख म्हणजे जगातील अशा मुलांच्या २८% मुले एकट्या आपल्या देशात असावीत ? ही भूषणावह गोष्ट म्हणायची काय ? संख्येने सांगायचे झाले तर भारतात एकूण ५कोटी ४० लाख मुले अल्पवजनी आहेत आणि तुम्हाला वाचून धक्का बसेल उभ्या जगातील अल्पवजनी मुलांपैकी ३७% मुले आपल्या भारतात आहेत. म्हणजेच जगातील १/३ पेक्षाही अधिक अल्पवजनी मुले फक्त आपल्या देशात आहेत . ती जन्मत:च कमकुवत आहेत.

आईला पौष्टिक अन्न न प्राप्त झाल्याने आई कमकुवत राहतें व आपोआपच आईच्या गर्भात वाढणारे मुलही कमकुवत जन्मते. या भीषण स्थितीला शास्त्रज्ञ एम.एस. स्वामीनाथन “जन्मापूर्वीची विषमता ” ( इनइक्वँलिटी बिफोर बर्थ) असे म्हटलं आहे. समान दर्जाचा आरोग्यदायी जन्म त्यांना दारिद्रय अवस्थेत प्राप्त होत नाही. जन्मत: जगण्याची लढाई हरलेल्या या बालकांना शारीरिक व आर्थिक दयनीय अवस्थेत ठेऊन विषमता रक्षण आपण करात नाहीत काय? अशी कोट्यावधी बालके दुर्बल असणारी भारतातील भावी पिढी असेल तर भारत बलाढ्य राष्ट्र बनेल तरी कसे ? आजच्या भारतात १० कोटी बालके ही ग़रीब कुटूंबातील आहेत. दारिद्रय व दयनीयता यांनी ते ग्रासले जाताहेत. दारिद्रयाचे दशावतार ते झेलताहेत. सारं बालपण ते हरवून बसले आहेत. यातील निम्मे ग़रीब बालकं ही दलित-आदिवासी आहेत. हे अक्षरश: लांच्छनास्पद आहे.

भावी समाज घडविणारी आई व भावी नागरिक बनणारी बालके यांची घोर उपेक्षा करणारा देश कोणत्या संस्कृतीचे गोडवे गाऊ शकतो हाही एक प्रश्नच आहे. असा अनारोग्यानं पछाडलेला भारत आपण घडवत आहोत याची सरकार व समाजाला लाज वाटली पाहिजे. मग ते सरकार आजचे असो की त्या आधीचे. मुलांचे आरोग्य नि आयुष्य अंध:कारमय करून कोणता देश प्रकाशमान भवितव्य घडवू शकतो ? . मुलांचे आयुष्य मातीमोल करून कोणत्या देशाचं कल्याण होणाराय? केंद्र व राज्य सरकारांकडं रस्त्यांसाठी व रेल्वेसाठी , उड्डाण पुलांसाठी लक्ष लक्ष कोटी रूपये असतात , देश संरक्षणावर लाखों कोटी ख़र्च करते , मग मुलांसाठी नि त्यांना जन्म देणारी आई यांच्यासाठी पैसा पुरेसा का नाही दिला जात ? त्यांना उध्वस्त व्हायच्या स्थितीला ठेऊन देश बलवान कसा होऊ शकेल? देशाचं संरक्षण जसे महत्वाचे तसेच बालकांच्या रूपातील भावी समाजाचे संरक्षण करणे महत्वाचे व प्राधान्याचे काम नव्हे काय ? या बालकांना ” अच्छे दिन ” आपण दाखवणार आहोत काय ? ते आपले कर्तव्य नव्हे काय ? रस्ते मोठे करणे , शहरं सुंदर करणे व स्मार्ट करणं जेवढं महत्वाचे तेवढंच महत्वाचे किंबहूना त्यातून अधिक महत्वाचे बालकांचे व स्त्रियांचे आरोग्य चांगले राखणे मोलाचे नव्हे काय ? मुठभर सुखवस्तू कुटूंबातील बालकं उत्तम आरोग्याची ठेऊन बाकीची कोट्यावधी बालकं मरतुकडी ठेवणे योग्य आहे काय? न्यायाचं आहे काय ? सर्वात महत्वाचे माणुसकीला शोभणारं आहे काय ?पुढच्या पिढी किडकी व कमकुवत ठेऊन देशाचं भलं कसं होईल ? या प्रश्नांचे उत्तर कोण देईल ?
बालकांच्या आईंची चिंतनीय स्थिती
या कमकुवत, अल्पवजनी व गरीबीनं पछाडलेल्या बालकांच्या आईंची अवस्था अधिकच चिंतनीय आहे. देशातील ५६% विवाहित महिलांची रक्तातील हिमोग्लोबीन पातली सर्वसाधारण स्तरापेक्षा कमी आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबीन या घटकाचे प्रमाण घसरल्याने रक्त सदोष आहे. भारतातील ४७% महिलांचा बॉडीमास इंडेक्स ( शरीराची सुदृढ़ता म्हणता येईल)हा किमान जेवढा हवा तेवढा नाही. आवश्यकतेपेक्षा कमी आहे. जेव्हा बालकांच्या आईचे आरोग्य निरोगी व निकोप नसेल तर त्याचा दुष्परिणाम त्यांना होणारी जी बालकं आहेत , त्यांच्या आरोग्यावर आपोआपच भयानक होतों. आणि पिढ्यानपिढ्या हे दुष्टचक्र चालूच राहतें .

ज्या कुटूंबात आरोग्य नाही , त्या कुटूंबाला भवितव्य नाही. आई कमकुवत म्हणून बालक कमकुवत , बालक कमकुवत म्हणून भावी युवक कमकुवत , युवक कमकुवत म्हणून देशही कमकुवत . भावी युवक कमकुवत म्हणून त्याची संततीही कमकुवत ! या कमकुवत मानवी पिढ्या घडविणारी ही दुष्ट व अमानवी व्यवस्था किती दिवस चालणार ? आपल्या समाजाला नि नेत्यांना या प्रश्नांचे भान व जाण आहे काय ? या वंचित वर्गासाठी काम करणं ही खरी देशभक्ती आहे.

लेखक-  PROF. DR. SUDHIR GAVHANE, Media& Higher Education Expert , Retired University teacher with 34 years experience at BAMU AURANGABAD [MAHARASHTRA] INDIA. Now Dean at MIT-WPU Pune.