जनधन, आधार, मोबाईल या त्रिसूत्रीमुळे भारताची बँकिंग व्यवस्था वेगळ्या उंचीवर- अर्थमंत्री

Minister for Finance

औरंगाबाद : जनधन, आधार आणि मोबाईल या त्रिसूत्रीमुळे भारताची बँकिंग व्यवस्था वेगळ्या उंचीवर पोहोचली आणि त्यामुळे मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या जन समुहाला सरकारी मदत मिळण्यास तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारमण यांनी केले आहे. औरंगाबाद शहरात आयोजित राष्ट्रीय बँक परीषद- ‘मंथन’ या एकदिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ आणि आता नव्याने जोडलेला ‘सबका विश्वास’ या उक्तीला सार्थ ठरवण्याच्यादृष्टीने प्रधानमंत्री जनधन योजना कार्यक्रम सुरू केला. कोणताही भेदभाव न करता मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या सर्वांचे बँकेत खाते या योजनेंतर्गत सुरू करण्यात येत आहेत. प्रत्येक वंचित कुटुंबाचे किमान एक तरी बँक खाते असावे, कोणताही संकोच न करता त्यांनी बँक व्यवहार करावेत, बचतीची सवय लागावी, त्याचबरोवर विविध योजनांचे त्यांना लाभ मिळावेत, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळेच कोविड-१९ च्या काळात सरकारला या गरीब लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मदत करता आल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.

सर्व जनधन खाती आधार क्रमांकाशी संलग्न केली गेल्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांची ओळख पटवणे सुलभ झाले असून भ्रष्टाचारालाही आपोआप आळा बसल्याचे त्यांनी सांगितले. सर्व जनधन खाते मोबाईल क्रमांकाशी जोडण्यात आली आहेत. त्यामुळे या खात्यात होणाऱ्या प्रत्येक व्यवहाराची माहिती ही एसएमएस संदेशाच्या माध्यमातून संबंधित खातेदाराला दिली जाते, विशेष म्हणजे क्षेत्रीय भाषेतून हे एसएमएस संदेश पाठवले जात असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. सध्या सरकार अनेक योजनांचे लाभ थेट हस्तांतरण योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या या प्रधानमंत्री जनधन खात्यात पैसे जमा करुन देत असल्याचे त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या