fbpx

‘इस्रो’ची सेंच्युरी :३१ उपग्रहांसह ‘पीएसएलव्ही सी-४०’ अंतराळात झेपावले

isro

टीम महाराष्ट्र देशा- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात इस्रोने शुक्रवारी नवा इतिहास रचला. ‘इस्रो’चे पीएसएलव्ही सी- ४० हे प्रक्षेपक ३१ उपग्रहांसह अंतराळात झेपावले. यात तीन भारतीय तर २८ विदेशी उपग्रहांचा समावेश आहे. अवकाशात झेपावलेले ‘इस्रो’चे हे शंभरावे उपग्रह आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले.

शुक्रवारी सकाळी ९ वाजून २९ मिनिटांनी ‘पीएसएलव्ही सी- ४०’ हे प्रक्षेपक ३१ उपग्रहांसह अवकाशात झेपावले आणि या मोहीमेची इस्रोच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली. पीएसएलव्ही सी 40 सोबत भारत तब्बल 31 उपग्रह सोडण्यात आले. यामध्ये 3 भारताचे तर 28 उपग्रह हे अन्य 6 देशांचे आहेत. यामध्ये फ्रान्स, फिनलँड, कॅनडा, इंग्लंड, अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा समावेश आहे.

भारतासाठी आजची मोहीम ऐतिहासिक होती. कारण गेल्या वर्षी इस्रोचं पीएसएलव्ही सी 39 हे मिशन अपयशी ठरलं होतं. त्यानंतर इस्रोने पुन्हा जोमाने तयारी करुन, पीएसएलव्ही सी 40 हा प्रक्षेपक हवेत झेपावण्यास सज्ज केलं होतं.यापूर्वी भारताने तब्बल 104 उपग्रह एकाचवेळी सोडून विश्वविक्रम केला होता.एखादा प्रक्षेपक/रॉकेट अपयशी ठरल्यानंतर, त्याची डागडुजी करुन तो उड्डाणासाठी पुन्हा तयार करणं हे वाटतं तितकं सोपं काम नाही. हे भारताचं ‘वर्कहॉर्स रॉकेट आहे’.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये इस्रोला अपयशाचा सामना करावा लागला होता. दिशादर्शक उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने इस्रोची मोहीम फत्ते होऊ शकली नव्हती. त्यानंतर इस्रोची ही पहिलीच मोहीम होती. २०१८ मधील ही पहिली मोहीम यशस्वी झाल्याने ‘इस्रो’वर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. इस्रोने १९९९ पासून व्यावसायिक शाखेच्या मदतीने परदेशी उपग्रह अवकाशात सोडण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. २०१६ मध्ये इस्रोने इतर देशांचे २२ उपग्रह प्रक्षेपित केले होते. मार्च २०१७ मध्ये इस्रोने एकाचवेळी ७ देशांचे १०४ उपग्रह अवकाशात सोडत रशियाचा विक्रम मोडीत काढला होता. याआधी रशियाने एकाचवेळी ३७ उपग्रह अवकाशात सोडण्याची किमया साधली होती. रशियाचा हाच विक्रम इस्रोने मोडला होता.

कार्टोसॅट 2

दरम्यान, भारत स्वत:चा एक मायक्रो आणि एक नॅनो उपग्रह सोडला. याशिवाय भारताचा सर्वात मोठा उपग्रह आहे तो म्हणजे कार्टोसॅट 2 सीरिज उपग्रह.कार्टोसॅट 2 हा उपग्रह म्हणजे भारताचा ‘आकाशातील डोळा’ म्हणून ओळखला जात आहे.आकाशातून पृथ्वीचे फोटो घेण्याची क्षमता या उपग्रहात आहे. भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमांवर शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी हे महत्त्वाचं काम करणार आहे.हा उपग्रह पृथ्वीची अवलोकन करणारी उच्च दर्जाची छायाचित्र पाठवणार आहे.