इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचं आजीवन अध्यक्षपद सुरेश कलमाडींनी नाकारलं

माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे आजीवन अध्यक्षपद नाकारले आहे. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्व माजी अध्यक्षांना आजीवन अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे सुरेश कलमाडी यांची आयओएच्या मानद आजीवन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, बुधवारी सुरेश कलमाडी यांनी आयओएला पत्र लिहून आपण हे पद स्वीकारु शकत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

सुरेश कलमाडी आणि अभय सिंह चौटाला यांच्या नियुक्ती झाल्याबद्दल माजी क्रीडा मंत्री आणि काँग्रेस नेते अजय माकन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या दोघांची नियुक्ती भारताच्या प्रतिमेला डागाळेल या शब्दांत त्यांनी असोसिएशनच्या निर्णयावर टीका केली. क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी देखील असोसिएशनला खडसावले होते. सुरेश कलमाडी यांचे नाव कॉमनवेल्थ घोटाळ्याशी जोडलेले असताना त्यांची आजीवन अध्यक्षपदी निवड करणे हे खपवून घेतले जाणार नाही असे त्यांनी म्हटले होते.