fbpx

भारतीय वंशांच्या नागरिकांसाठी महाराष्ट्रात गुंतवणुकीची योग्य संधी- राज्यपाल विद्यासागर राव

मुंबई : महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानीबरोबरच सांस्कृतिक राजधानीही आहे. हे राज्य देशात औद्योगिक प्रगत आहे. मेक इन इंडिया, थेट परकिय गुंतवणूक यामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची ही योग्य संधी असून जगभरातील भारतीय वंशाच्या नागरिकांनी ती घ्यावी, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.

ग्लोबल ओरिजिन ऑफ पिपल ऑफ इंडियन ओरिजिन (GOPIO) यांच्या गोपीओ इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स या संघटनेच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते. यावेळी आमदार आणि गोपीओचे विशेष सल्लागार राज पुरोहित, संघटनेचे अध्यक्ष नीरज बक्षी, चेअरमन थॉमस अब्राहम, फेडेरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष विनेश मेहता, सुरेश लाखनी, प्रकाश शहा, नोएल लाल आदी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, देशाच्या आर्थिक विकासात जगभरातील भारतीय वंशाच्या नागरिकांचे योगदान मोलाचे आहे. या नागरिकांनी विविध देशात जाऊन केलेल्या कामांचे महत्त्व वेगळे आहे. त्या देशातील स्थानिक संस्कृती जोपासतानाच भारतीय परंपरेचेही त्यांनी जतन केले. भारत हा आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर असून याबदलामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन वर्षात उद्योगस्नेही वातावरण, पारदर्शकता यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मेक इन इंडिया, डिजीटल इंडिया, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत मिशन याबरोबरच उद्योग व व्यापार वाढीसाठी पावले उचलली आहेत. देशाच्या तसेच महाराष्ट्रातील उद्योगांसाठीच्या पोषक वातारणामुळे नव्याने निर्माण होत असलेल्या गोपिओ इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यांनी येथील गुंतवणूक संधीचा लाभ घेऊन देशाच्या विकासात योगदान द्यावे, असेही राज्यपाल श्री.राव यांनी यावेळी सांगितले.

राज पुरोहित, उदय वेद, श्री. बक्षी, श्री. अब्राहम आदींची यावेळी भाषणे झाली.