भारतीय लष्कर’ ही नरेंद्र मोदींची सेना, वादग्रस्त वक्तव्याने भाजपचे योगी अडचणीत

YOGI_Adityanath

नवी दिल्ली : भारतीय लष्कर हे ‘नरेंद्र मोदी यांची सेना आहे’ असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केले आहे. या वक्तव्यावरून आता योगी अडचणीत सापडले आहेत. गाझियाबाद येथील प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. गाझियाबाद जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या सभा संदर्भातील व्हिडिओ क्लिप आणि त्याचं भाषांतर मागवण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आचारसंहितेचं उल्लंघन झालंय अथवा नाही, याची चौकशी होणार आहे. निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांना याअगोदरच, लोकसभा निवडणुकीदरम्यान सुरक्षा दलाविषयी कोणताही मुद्दा उपस्थित न करण्याचा आणि दुष्प्रचार न करण्याची ताकीद दिली होती.

दहशतवादाला आळा घालण्यात विरोधक अपयशी ठरल्याची टीका करण्याच्या भरात योगी यांनी हे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे एक नवा वाद उभा राहिला आहे. विरोधकांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर भारतीय सेनेचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

‘काँग्रेसचे लोक दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालत होते आणि मोदींची सेना आज दहशतवाद्यांना गोळ्या घालत आहेत. हाच फरक आहे. काँग्रेसचे लोक दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी मसूद अजहरच्या नावासमोर ‘जी’ वापरतात’ असं वादग्रस्त वक्तव्य योगी आदित्यनाथांनी जाहीर सभेत केले होते.

भारतीय लष्कराचा ‘मोदी की सेना’ असा उल्लेख करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल निवडणूक आयोगाने आदित्यनाथ यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. देशाच्या सेनादलांची ‘मोदी की सेना’ अशी संभावना करून आदित्यनाथ यांनी सेना दलाचा अपमानच केला आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरद्वारे केलीय.