पुलवामात ४ दहशतवाद्यांना कंठस्नान

टीम महाराष्ट्र देशा :आज सकाळी जम्मू आणि काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात असणाऱ्या लस्सीपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या चकमकीत लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं आहे. त्यामुळे या भागात तणावपूर्ण वातावरण आहे.

मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांच्याजवळ दोन एके रायफल, एक एसएलआर आणि एक पिस्तुल हि शस्त्रे सापडली आहेत. या भागात अजून काही दहशतवादी लपल्याची शंका आहे त्यामुळे त्यांची शोधमोहीम सुरु आहे. तसेच या चकमकीत लष्कराचे ३ जवान आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं वृत्त आहे. या जवानांवर उपचार सुरु आहेत.