जयललितांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा, सुप्रीम कोर्टात याचिका

जयललिता मृत्यू

नवी दिल्ली : तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. एका एनजीओने सुप्रीम कोर्टात ही जनहित याचिका दाखल केली आहे.

जयललितांचा मृत्यू झाला त्या रुग्णालयातील म्हणजेच अपोलो हॉस्पिटलमधील जयललितांचे रेकॉर्ड्स आणि वैद्यकीय अहवाल, तसंच मृत्यूचं कारण सार्वजनिक करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

जयललिता यांच्या निधनाच्या धक्क्यानं एकूण 280 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 3 लाखांची मदत एआयडीएमके करणार आहे. तर जयललिताच्या निधनानं ज्यांनी स्वतःला इजा करुन घेतली, त्यांना 50 हजारांची मदत करण्यात येणार आहे.

दोन महिन्यांपासून जयललिता फुफ्फुसाच्या विकारामुळे अपोलो रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र, सोमवार 5 डिसेंबर 2016 च्या रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर तामिळनाडू राज्य शोकसागरात बुडालं.