टीम इंडियाचा विंडीजवर २५७ धावांनी विजय, कसोटी मालिका २-० ने जिंकली

टीम महाराष्ट्र देशा : टीम इंडियाने विंडीजचा दुसऱ्या कसोटी सामन्यात २५७ धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने २ सामन्यांची मालिका २-० ने जिंकली आहे. टीम इंडियाने सांखिक खेळाच्या जोरावर हा विजय मिळवला आहे. भारतानं दिलेल्या ४६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा संघ भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे २१० धावांपर्यंत मजल मारू शकला.

टीम इंडियाच्या विजयात फलंदाजीमध्ये हनुमा विहारी आणि गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरी केली. विहारीने पहिल्या डावात शतकी खेळी केली होती. तर बुमराहने पहिल्या डावात शान्फार गोलंदाजी केली होती. तसेच त्यांना इतर खेळाडूंचीही चांगली साथ लाभली त्यामुळे हा विजय मिळवणे शक्य झाले.

दरम्यान, भारतानं दिलेल्या ४६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या फलंदाजांनी नांगी टाकली. विंजीजकडून शामरा ब्रूक्सनं दुसऱ्या डावात सर्वाधिक ५० धावा केल्या. तसेच कर्णधार जेसन होल्डरनं ३९ आणि ब्लॅकवूडनं ३८ धावा केल्या. टीम इंडियाकडून मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन तर इशांत शर्मानं २ गडी बाद केले आणि बुमराहनने एक गडी बाद केला.

या सामन्यासह टीम इंडियाचा विंडीज दौरा आत संपला आहे. टीम इंडिया पुढची मालिका ही मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. यात ट्वेंटी २० आणि कसोटी मालिकेचा समावेश आहे. या मालिकेला १५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.