भारताने सामना जिंकला

r ashwin

कोलंबो: येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेचा एक डाव आणि 53 धावांनी पराभव करत शानदार विजय प्राप्त केला आहे. श्रीलंकेचा पहिला डाव १८३ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर दुसऱ्या डावात देखील भारतीय गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी करत विजयाला गवसणी घातली.
फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात चिवट फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या फलंदाजांना डावाचा पराभव टाळता आला नाही. दिमुथ करुणारत्ने आणि कुसल मेंडिस यांनी शतकी खेळी करून भारतीय गोलंदाजांचा घाम काढला, पण त्यांचे इतर खेळाडू रवींद्र जाडेजाच्या फिरकीपुढे फारसे टिकू शकले नाहीत. त्यामुळे एक डाव आणि ५३ धावांनी टीम इंडियाने दुसरी कसोटी जिंकली.
चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणेची जिगरबाज शतकं आणि त्यांना चार सहकाऱ्यांनी दिलेली अर्धशतकी साथ या जोरावर पहिल्या डावात ९ बाद ६२२ धावांचा डोंगर उभारून भारतानं डाव घोषित केला होता. त्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली होती. आर अश्विनच्या फिरकीनं त्यांची गिरकी घेतली आणि १८३ धावांवर अख्खा संघ गारद झाला होता. भारताकडे ४३९ धावांची भरभक्कम आघाडी होती. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीनं श्रीलंकेवर फॉलोऑन लादला. पुन्हा एकदा यजमानांना झटपट गुंडाळण्याचा टीम इंडियाचा विचार होता. पण, लंकेचे दोन वीर भारताशी भिडले. कुसल मेंडिस आणि करुणारत्ने यांनी झुंजार खेळी करत किल्ला लढवला. डावाचा पराभव टाळण्याच्या इराद्यानेच ते खेळत होते. मात्र, ही जोडी फुटल्यावर जाडेजानं मोठी भागीदारी होऊच दिली नाही. त्यानेच अर्धा संघ तंबूत पाठवल्याने लंकेचा दुसरा डाव ३८६ धावांवर आटोपला आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतानं २-० अशी निर्णायक आघाडी घेतली.Loading…


Loading…

Loading...