भारताचे न्यूझीलंडला जश्यास तसे उत्तर, ७ गाडी राखून जिंकला दुसरा टी २० सामना

टीम महाराष्ट्र देशा : ऑकलंड येथे झालेल्या भारत वि. न्यूझीलंड दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ७ गडी राखून विजय मिळवला आहे. पहिल्या टी २० सामन्यात भारताचा न्यूझीलंड संघाने चांगलाच धुवा उडवला होता पण आजचा सामना जिंकून भारताने प्रतिस्पर्धी संघाला जश्यास तसे उत्तर दिले आहे. न्यूझीलंडने भारता समोर १५९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.सलामीच्या फलंदाजांच्या दमदार खेळीमुळे भारताने हे आव्हान १९ व्या षटकातचं पूर्ण केले.

नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कृणाल पांड्याच्या गोलंदाजीने न्यूझीलंडच्या आघाडीच्या फलंदाजांना लवकरच तंबूचा मार्ग दाखवला. ग्रँडहोम (५०) आणि टेलर (४२) यांच्या संयमी खेळीमुळे न्यूझीलंड संघ १५८ धावांपर्यंत मजल मारू शकला. कृणाल पांड्याने न्यूझीलंडच्या महत्वाच्या फलंदाजाना बाद करत ३ विकेट आपल्या खिशात घातल्या. कृणाल पाठोपाठ इतर गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली खलिल अहमद ने २ विकेट घेतल्या तर हार्दिक पांड्याने आणि भुवनेश्वरने प्रत्येकी १ विकेट घेतली.

न्यूझीलंडने ठेवलेल्या १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीच्या फलंदाजांनी आक्रमक सुरवात केली. रोहितने यावेळी २९ चेंडूंत ३ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५० धावा केल्या तर धवन (३०) , आणि पंत (४०*) ने त्याला उत्तम साथ दिली. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना फर्गुसन , सोढी , मिशेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.