मालिका जिंकून टीम इंडिया ने दिले देशवासियांना अनोखं गिफ्ट

india wins

पल्लेकेल: येथे सुरु असलेली तिसरी आणि शेवटची कसोटी भारताने १ डाव आणि १७१ धावांनी जिंकून श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका ३-०ने जिंकली. याबरोबर तीन किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने प्रथमच परदेशात एखाद्या संघाला व्हाइट वॉश दिला आहे हा विजय साकारत स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधीच टीम इंडिया ने  देशवासियांना अनोखं गिफ्ट दिले आहे.

दिवसाच्या सुरुवातीला काही मिनीटांमध्येच रविचंद्रन अश्विनने दिमुथ करुणरत्नेला स्लिपमध्ये अजिंक्य रहाणेच्या हाती झेल द्यायला भाग पाडत श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. यानंतर मोहम्मद शमीने श्रीलंकेला पुन्हा २ धक्के दिले. शमीने लंकेचा नाईट वॉचमन मलिंदा पुष्पकुमारालाही मैदानावर फारकाळ टिकू दिलं नाही. यष्टीरक्षक वृद्धीमान साहाच्या हाती झेल द्यायला भाग पाडत शमीने लंकेला धक्का दिला. यापाठोपाठ कुशल मेंडीस शमीच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. त्यामुळे लंकेची अवस्था सामन्यात काहीशी बिकट झालेली पहायला मिळाली.
मात्र यानंतर कर्णधार दिनेश चंडीमलने अँजलो मॅथ्यूजसोबत पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या डावासा स्थैर्य आलं. मात्र चंडीमलला बाद करत कुलदीपने श्रीलंकेला आणखी एक धक्का दिला. कर्णधार चंडीमल माघारी परतल्यानंतर रविचंद्रन अश्विनने अँजलो मॅथ्यूजलाही माघारी धाडलं लंकेला सहावा धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने दिलरुवान पेरेराही माघारी परतल्याने श्रीलंकेची अवस्था अधिकच बिकट झालेली पहायला मिळते आहे. यानंतर श्रीलंकेच्या तळातला एकही फलंदाज मैदानात जास्तवेळ तग धरु शकला नाही.

भारताकडून आर अश्विनने 4 मोहम्मद शमीने 3, उमेश यादवने 2 तर कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 304 धावांनी विजय मिळवला होता. दुसरा सामना एक डाव आणि 53 धावांनी जिंकला होता. तर अखेरच्या कसोटीत भारताने एक डाव आणि 171 धावांनी मोठा विजय संपादन केला.परदेशातील डावाच्या फरकाने भारताचा हा दुसरा मोठा विजय ठरला आहे तर श्रीलंकेविरुद्ध सलग ५ सामन्यात भारताने विजय मिळविले आहेत. ३ किंवा त्यापेक्षा जास्त सामन्याच्या कसोटी मालिकेत भारताने ५व्यांदा एखाद्या संघाला व्हाइट वॉश दिला आहे.