तर जगात भारताला नामर्द म्हटले जाईल ; संजय राऊत

sanjay-raut-

नवी दिल्ली: मोदी सरकार पाकिस्तानला उत्तर देण्यास अपयशी ठरले आहे. जम्मू- काश्मीरच्या राजौरी आणि पूँछ जिल्ह्यांमध्ये रविवारी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबार आणि उखळी तोफांच्या माऱ्यात लष्कराचे तीन जवान आणि कॅप्टन दर्जाचा अधिकारी शहीद झाले. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत, जर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले नाही तर जगात भारताला नामर्द म्हटले जाईल. असे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?

पाकिस्तानने रविवारी भारतीय जवानांवर हल्ला करण्यासाठी मिसाईल्सचा वापर केला. मग आपल्याकडील क्षेपणास्त्रांचा वापर फक्त राजपथावरील संचलन आणि २६ जानेवारीला परदेशी पाहुण्यांना दाखवण्यासाठीच करणार का? शस्त्रसंधीच्या उल्लंघनापेक्षा हे सरळ सरळ युद्धच आहे. हा भारतावरील हल्ला आहे आणि त्याला प्रत्युत्तरही तशाच पद्धतीने दिले पाहिजे. जर तुम्ही तसे उत्तर दिले नाही तर जगात भारताला नामर्दच म्हटले जाईल.