fbpx

लंकेच्या फलंदाजांची यशस्वी झुंज ;तिसरी कसोटी अनिर्णित

team india

टीम महाराष्ट्र देशा- फिरोजशहा कोटला मैदानावर रंगलेला तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश आले. मात्र, भारतीय संघाने तीन सामन्यांची कसोटी मालिका १-० अशी जिंकली. चौथ्या दिवशी श्रीलंकेची ३ बाद ३१ अशी बिकट अवस्था केल्यानंतर आज भारतीय संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरला. मात्र, धनंजया सिल्व्हाच्या नाबाद ११९ धावा आणि रोशन सिल्व्हाच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले.

भारतीय क्षेत्ररक्षकांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना पहिल्या डावात दिलेल्या चार आणि दुसऱ्या डावात दिलेल्या दोन जीवदानांनी ही कसोटी ड्रॉच्या दिशेनं गेली. श्रीलंकेचा शतकवीर धनंजय डिसिल्व्हासह दिनेश चंडिमल, रोशन सिल्व्हा आणि निरोशन डिकवेला यांच्या झुंजार फलंदाजीनं ही कसोटी अनिर्णीत राखली.मात्र, टीम इंडियानं दुसऱ्या कसोटीतल्या विजयासह तीन कसोटी सामन्यांची ही मालिका १-० अशी खिशात टाकली. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताचा हा सलग नववा कसोटी मालिका विजय ठरला आहे.

श्रीलंकेच्या धनंजया डी सिल्व्हाने थकवा जाणवू लागल्यानंतर मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. मैदानातून बाहेर जाण्यापूर्वी त्याने आपल्या संयमी खेळीने कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले होते. त्यानंतर श्रीलंकन फलंदाज रोशन सिल्व्हा आणि डिक्व्वेला यांनी संयमी खेळी करत भारताच्या विजयावर पाणी फेरले.भारतीय कर्णधार विराट कोहलीने ५ बाद २४६ धावावर दुसरा डाव घोषित केला होता. पहिल्या डावातील १६३ धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील २४६ धावासह भारताने श्रीलंकेसमोर ४१० धावांचे लक्ष्य ठेवले होते. श्रीलंकेने दुसऱ्या डावात ५ बाद २९९ धावा केल्या. रोशन सिल्व्हा (७४) आणि निरोशान डिक्वेला (४४) धावावर नाबा राहिले.

संक्षिप्त धावफलक:
भारत पहिला डाव: ७ बाद ५३६ धावा (घोषित)
श्रीलंका पहिला डाव: सर्वबाद ३७३ धावा
भारत दुसरा डाव: ५ बाद २४६ धावा (घोषित)
श्रीलंका दुसरा डाव: ५ बाद २९९ धावा

सामनावीर: विराट कोहली.
(पहिला डाव २४३ धावा, दुसरा डाव: ५० धावा)

मालिकावीर: विराट कोहली.