मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) संपल्यानंतर भारतीय संघ लगेचच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेवेळीच भारतीय संघ इंग्लंडलाही (India vs England) रवाना होणार आहे, त्यामुळे दोन्ही मालिकांसाठी वेगवेगळ्या संघांची निवड होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. राहुल द्रविड कसोटी संघासोबत इंग्लंडला जाणार असल्यामुळे दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारतीय संघाचा प्रशिक्षक कोण असेल? हा प्रश्न उपस्थित झाला होता. पण यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणचे (VVS Laxman) नाव पुढे आले आहे. लक्ष्मण दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडू शकतो.
भारतीय संघाला २६ जून ते २८ जून दरम्यान आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. टीम इंडियाचे नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड १५ किंवा १६ जून रोजी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंसोबत इंग्लंड दौऱ्यावर रवाना होऊ शकतात. भारतीय संघ १ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.
इनसाइड स्पोर्टशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘राहुल द्रविड १५ किंवा १६ जून रोजी भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होईल. याशिवाय बोर्ड व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman)ला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी-२० मालिका आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी प्रशिक्षक म्हणून सामील करण्याची शक्यता आहे.
शिखर धवन कर्णधारपदाचा दावेदार
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना आराम दिला जाणार आहे. त्यामुळे चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली चालणारी निवड समिती युवा खेळाडूंना संधी देईल. याशिवाय आयपीएल (IPL 2022) मध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक यांचदेखील संघामध्ये पुनरागमन होण्याची शक्यता आहे. तर शिखर धवनकडे कर्णधार पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. मागील वर्षीही भारतीय संघ इंग्लंडमध्ये असताना भारताचा दुसरा संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता, तेव्हा शिखर धवनला दुसऱ्या संघाचं नेतृत्व देण्यात आलं होतं.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com