मुंबई : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-२० जोरदार पुनरागमन केले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले दोन सामने गमावले होते. यानंतर संघाने सलग दोन सामने जिंकून ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. आता रविवारी मालिकेतील निर्णायक सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे जो संघ हा सामना जिंकेल, मालिका त्याच्या नावावर होईल. अशा स्थितीत दोन्ही संघ शेवटच्या लढतीत जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावतील. मागील दोन सामने जिंकल्यामुळे भारतीय संघाचे पारडे थोडे जड वाटत आहे. मात्र या सामन्यापूर्वी बंगळुरूच्या हवामानाबाबत आलेल्या बातम्यांमुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा वाढणार आहे. कारण रविवारी बंगळुरूमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत निर्णायक सामन्यात पाऊस खलनायक ठरू शकतो.
आतापर्यंत या मालिकेतील चार सामने वेगवेगळ्या शहरात खेळले गेले आहेत. पावसामुळे या सामन्यात कोणताही अडथळा आलेला नाही. उलटपक्षी खेळाडूंना उष्णता आणि आर्द्रतेचा सामना करावा लागला होता. पण बंगळुरूमध्ये उष्णतेपासून खेळाडूंना दिलासा मिळणार आहे. मात्र पावसामुळे सामना बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ॲक्यूवेदर डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, रविवारी बंगळुरूमध्ये मधूनमधून पाऊस पडू शकतो. दिवसाचे तापमान २७ अंश राहील त्यामुळे पावसाची शक्यता ८८ टक्क्यांहून अधिक आहे. दिवसभर ढगाळ वातावरण रहण्याचीही दाट शक्यता आहे.
बंगळुरूमध्ये पावसामुळे सामन्यात अडथळा येऊ शकतो
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा टी-२० सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. संध्याकाळी ७ वाजता हा सामना सुरू होईल. त्यामुळे, मग संध्याकाळी हवामान कसे असेल? पावसामुळे खेळात व्यत्यय येईल का? हे जाणून घेणेही गरजेचे आहे. ॲक्यूवेदर डॉट कॉमच्या मते, रविवारी संध्याकाळी बेंगळुरूमध्ये तापमान २१ अंश असेल आणि पावसाची शक्यता ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे संध्याकाळीही ढगाळ वातावरण राहील. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग ताशी २८ किमी असा असेल. अशा स्थितीत सामन्यावर पावसाचे सावट पडू शकते. या स्थितीत क्रिकेटप्रेमींना पुर्ण २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळण्याची आशा कमी आहे.
भारताने बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आतापर्यंत ८ टी-२० सामने खेळले आहेत. या मैदानावर ५ वेळा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला ३ सामन्यात यश मिळाले. तसे, मैदान लहान असल्यामुळे येथे बरेच चौकार, षटकार मारले जातात. यापूर्वीही या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पडला आहे. पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १५४ तर दुसऱ्या डावाची सरासरी १४३ धावांची राहिली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटचा सामना याच मैदानावर २०१९ मध्ये झाला होता. त्या सामन्यात पाहुण्या संघाने भारताचा ९ गडी राखून पराभव केला होता. त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने अवघ्या १३४ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने १ गडी गमावून हे लक्ष्य गाठले होते. सामन्यात क्विंटन डी कॉकने नाबाद ७९ धावा केल्या होत्या. भारताने या मैदानावर ५ टी-२० सामने खेळले असून ३ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<