आज बंगळूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा टी -20 सामना

टीम महाराष्ट्र देशा :कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मोहाली येथे टीम इंडियाने दुसरा टी -20 सामना 7 गडी राखून जिंकला. आता टीम इंडियाला बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर शेवटचा टी -20 सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. धर्मशाळा येथे खेळला गेलेला पहिला सामना पावसामुळे वाहून गेला होता, त्यामुळे आता सर्वांचे डोळे पुन्हा बेंगळुरूच्या हवामानाकडे लागले आहेत.

तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर आहे. आज बेंगळुरूमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सामन्यादरम्यान आकाशात ढग दाट असतील अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. हलका पाऊस होऊ शकतो. वादळी वाऱ्याचीही शक्यता आहे. त्यामुळे हा सामना होईल का नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

भारतीय संघाने मोहाली येथील सामना कर्णधार विराट कोहलीच्या शानदार फलंदाजीच्या जीवावर जिंकला आहे. त्यामुळे त्याच्याकडून या सामनात अशाच कामगिरीची अप्र्क्षा आहे. तसेच फलंदाजीत सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनाही चांगला खेळ कराव लागेल तसेच यष्टीरक्षक रिषभ पंतला कामगिरी सुधारावी लागणार आहे.

दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी मागील सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. नवदीप सैनी थोडासा महागडा ठरला होता त्याच्या जागी खलील अहमदला संधी मिळू शकते. बाकी संघात फारसा बदल होण्याची शक्यता नाही.