दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०साठी टीम इंडिया सज्ज

टीम महाराष्ट्र देशा- भारत आणि दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज मोहाली इथं होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. या सामन्यात नाणेफेक देखील झाली नसल्यानं प्रेक्षकांना उद्यापासून तिकिटांचे पैसे परत दिले जाणार असल्याचं हिमाचल क्रिकेट संघटनेनं सांगितलं.

या लढतीत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कामगिरीकडे लक्ष असेलच; पण त्याहीपेक्षा भारतीय फलंदाज दक्षिण आफ्रिकेचा तेज गोलंदाज कागिसो रबाडाचा मुकाबला कसा करतात, हेदेखी पाहिले जाईल.खेळपट्टीचे स्वरूप पाहूनच टीम इंडियाची निवड केली जाईल. त्यात एक की दोन फिरकी गोलंदाज खेळवायचे की अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला संधी द्यायची यावर खल केला जाईल. वेस्ट इंडीज दौऱ्यावरून परतल्यानंतर भारतीय संघ एकही सामना खेळलेला नसल्यामुळे प्रत्येकाला पहिल्या चेंडूपासून लय मिळवावी लागेल.

धर्मशालामध्ये निराशा मिळाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष मोहालीच्या हवामानावर आहे. दरम्यान चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 18 सप्टेंबरला होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पावसाची कोणतीही शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली नाही. हा सामना सायंकाळी सात वाजता सुरू होईल. त्यावेळी मोहालीचे तापमान 28 ते 31 डिग्री असू शकते. दरम्यान मॅच सुरू असताना साडे आठ वाजण्याच्या सुमारास 5 टक्के किंवा 10 टक्के पावसाची शक्यता आहे.