भारताची आज किवींशी झुंज, मॅन्चेस्टरवर आज ऊन – पावसाचा खेळ

टीम महाराष्ट्र देशा : इंग्लंडच्या मॅन्चेस्टर मैदानावर आज भारत वि. न्यूझीलंड सामना होणार आहे. भारताचा हा विश्वचषकातील ३ रा सामना असणार आहे. न्यूझीलंडच्या संघापेक्षा भारताला इंग्लंडच्या बदलत्या हवामानाचे आव्हान असणार आहे. कारण गेले २ ते ३ दिवस मॅन्चेस्टरवर मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यावर देखील पावसाच सावट असल्याच सांगण्यात येत आहे.

न्यूझीलंड संघाने विश्वचषकात आतापर्यंत चांगली कामगिरी बजावली आहे. तसेच रंकिंग टेबलमध्ये देखील न्यूझीलंडने अव्वल स्थान पटकावले आहे. न्युझीलंडचे आता पर्यंत तीन सामने झाले आहेत. त्यातला एकही सामना न्यूझीलंड संघ हरलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंडचे मनोबल हे काही अंशी भारता पेक्षा जास्त असेल. पण भारताने देखील दोन बड्या संघाना धुळीत मिळवत विश्वचषकात दमदार एन्ट्री केली आहे. त्यामुळे आजचा सामना हा बरोबरीचा असणार आहे.
साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला हरवत भारताने रंकिंग टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.तर या दोन्ही सामन्यामध्ये भारताने उल्लेखनीय गोलंदाजी आणि फलंदाजी केली आहे. मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन हा हाताला बॉल लागल्यामुळे जखमी झाला आहे. त्यामुळे शिखर धवनला उपचारासाठी तीन आठवड्याच्या सुट्टीवर पाठवण्यात आले आहे.

शिखर धवनच्या अनुपस्थितीत के एल राहुल सलामीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच शिखर धवन नसल्याने भारताला डावखुऱ्या फलंदाजाची कमी जाणवणार आहे. इंग्लंडच्या लहरी वातावरणाचा परिणाम भारतच्या फलंदाजीवर होणार आहे. कारण न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज बोल्ट हा भारताला आव्हान ठरणार आहे. बोल्ट हा डावखुरा गोलंदाज आहे. त्यात पीच जर गवत असेल तर बॉल स्विंग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे बोल्टची गोलंदाजी रोहित शर्मा, के एल राहुल यांना मारक ठरू शकते.