आर-पारच्या लढाईसाठी दोन्ही टीम सज्ज

Ind vs Aus T20 match

टीम महाराष्ट्र देशा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका एका रंजकदार वळणावर येऊन ठेपली आहे. जो संघ शुक्रवारी होणारा तिसरा सामना जिंकेल, त्याला मालिका विजय मिळवता येईल. त्यामुळेच हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.भारताचे फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या जेसन बेहरेन्डॉर्फच्या भेदक वेगवान गोलंदाजीपुढे नतमस्तक झाले. त्यामुळे या सामन्यात जेसनच्या गोलंदाजीचा सामना भारतीय फलंदाज कसा करतात, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

आजचा सामना जिंकला तर 70 वर्षात भारत पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला तीनही फॉरमॅटमध्ये सलग चारवेळा हरवण्याचा विक्रम रचेल.भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या मागील तीनही मालिकेत विजय मिळवला आहे.2016 मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात टी 20 मालिकेत 3-0 ने हरवलं होतं. त्यानंतर भारतातील कसोटी मालिका 2-1 ने जिंकली होती, मग आता नुकत्याच झालेल्या वन डे मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला 4-1 ने धूळ चारली.

दरम्यान गुवाहाटीच्या सामन्यात आधी भारतीय फलंदाजांचं अपयश आणि त्यानंतर गोलंदाजांची खराब कामगिरी भारताच्या पराभवास कारणीभूत ठरली. त्यात जेसन बेहरेन्डॉर्फच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताच्या सुरुवातीच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, मनीष पांडेसारखे खंदे शिलेदार केवळ 27 धावात तंबूत परतल्यानं भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यानंतर गोलंदाजांच्या निष्प्रभ कामगिरीमुळे केवळ 119 धावांचं माफक लक्ष्य कंगारुनी 15 षटकं आणि तीन चेंडूतच पार केल. तेही केवळ दोन विकेट्सच्या मोबदल्यात. कांगारुंच्या या विजयानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे त्यामुळे हैदराबादची लढत दोन्ही संघाच्या दृष्टीनं निर्णायक ठरणार आहे.