वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी भारतीय संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण?

मुंबई : वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी भारतीय संघाची निवड रविवारी (दि. 21) होणार आहे. या दौर्‍यातून महेंद्रसिंग धोनीने माघार घेतली आहे, तर कर्णधार विराट कोहली उपलब्ध आहे. संघातील बहुतांश अनुभवी खेळाडूंना विश्रांती देऊन निवड समिती युवा खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संघात कोणते युवा चेहरे असतील याविषयी उत्सुकता आहे.

एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय वरिष्ठ निवड समितीच्या मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित बैठकीत ही निवड करण्यात येणार आहे. या बैठकीनंतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत नव्या संघाची घोषणा होईल. माजी कर्णधार एमएस धोनी विंडीज दौऱ्यात नसेल हे त्याने आधीच स्पष्ट केले आहे. विराट कोहलीने मात्र आपण विश्रांती घेणार नसल्याचे म्हटले आहे.

भारताचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहा दुखापतीतून सावरला असून इंडिया ए मध्ये खेळत आहे. तो बाहेर गेल्यानं पंतला संधी मिळाली होती. पंतने फलंदाजीत चमक दाखवली असली तरी यष्टीरक्षणात मात्र तो कमी पडताना दिसत आहे. 34 वर्षीय साहाने 32 कसोटीत 1 हजार 164 धावा केल्या होत्या. याशिवाय यष्टीरक्षण करताना 75 झेल आणि 10 स्टम्पिंग केले होते.