टीम इंडिया खेळणार डे-नाईट कसोटी?

वेब टीम- बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघ ऑक्टोबर 2018 मध्ये वेस्टइंडिज विरुद्ध आपली पहिली डे-नाईट कसोटी खेळणार आहे.

या कसोटीसाठी बीसीसीआयने हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची निवड केली आहे. हा सामना गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. असे असले तरी याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

आतापर्यंत 10 डे-नाइट कसोटी खेळवण्यात आले आहेत. भारत आणि बांगलादेश वगळता सर्व देशांनी डे-नाइट कसोटी खेळल्या आहेत.

टीम इंडियाला भारतात यावर्षी तीनच कसोटी सामने खेळायचे आहेत. पहिली कसोटी अफगाणिस्तानसोबत जूनमध्ये असणार आहे. त्यानंतर वेस्टइंडिजचा संघ ऑक्टोबरमध्ये भारताचा दौरा करणार आहे. यावेळी भारताला दोन कसोटी सामने खेळावे लागणार आहेत. त्याच वेळी डे-नाइट कसोटी खेळवण्यात येईल अशी चर्चा सुरु आहे.