कोरोना रुग्णवाढीने गाठला नवा उच्चांक, देशासाठी पुढील चार आठवडे अत्यंत महत्वाचे !

corona

नवी दिल्ली : दिवसेंदिवस कोरोना रुग्णवाढ झपाट्याने वाढत आहे. आता देशाची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. भारतात कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक नोंदवला गेला आहे. गेल्या 24 तासांत देशात 1,15,736 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. याआधी 5 एप्रिलला पहिल्यांदाच एक लाखांचा टप्पा पार करत सर्वाधिक रुग्णवाढ झाली होती. यासोबत देशातील रुग्णांची एकूण संख्या 1,28,01,785 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला देशात 97 हजार 894 रुग्णांची नोंद झाली होती. कोरोनाकाळातील ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ होती. मात्र, आता महाराष्ट्रासह अन्य राज्यांत वेगाने कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यामुळे नवीन कोरोना रुग्णांची भर पडल्याने हा नवा उच्चांक नोंदवण्यात आला आहे.

याच दरम्यान पुढील चार आठवडे ‘अतिशय महत्त्वाचे’ असल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला असून या महामारीची दुसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करायला हवं, असंही म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटलं की, नागरिकांनी मास्क लावण्यासारख्या खबरदारीच्या उपायाला जणू काही ‘तिलांजली’ दिली आहे.

दरम्यान, देशात कोरोनाव्हायरस मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वेगाने पसरत आहे आणि नागरिकांनी महामारीची दुसरी लाट रोखण्यासाठी सहकार्य करायला हवं. केंद्र सरकारच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषदेत म्हटलं की देशात एकाच दिवशी एक लाखांपेक्षा जास्त नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद पुन्हा एकदा होऊ शकते आणि ही मागच्या तुलनेत अधिक असू शकते.

महत्वाच्या बातम्या