कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णसंख्येबाबत भारत तिसऱ्या स्थानावर

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्ण संख्या १ कोटी ९९ लाख १९ हजार ७१५ वर पोहोचली आहे. म्हणजेच सोमवारी संध्याकाळपर्यंत भारतातील कोरोना रुग्ण संख्या २ कोटींपेक्षा जास्त झालेली असेल. दोन कोटींपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना संसर्ग झालेल्या देशांच्या यादीत भारताचा दुसरा क्रमांक असेल. अमेरिकेमध्ये सर्वाधिक ३.३८ कोटी नागरिकांना कोरोना संसर्ग झाला आहे. मात्र, या सर्वात भयावह स्थिती म्हणजे कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या बाबतीत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे.

वास्तविक गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णसंख्येत काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. रविवारी देशात ३ लाख ६९ हजार ९४२ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. तर २ लाख ९९ हजार ८०० रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी देशात विक्रमी ४ लाख २ हजार १४ नवीन रुग्ण नोंदवण्यात आले होते. मात्र, शनिवारी आणि रविवारी यामध्ये थोडी घट नोंदवण्यात आली.

कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत भारताने मॅक्सिकोला मागे टाकले आहे. या यादीत भारत सध्या तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारतात आतापर्यंत २ लाख १८ हजार ९४५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या बाबत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेमध्ये ५ लाख ९२ हजार तर दुसऱ्या क्रमांकावरील ब्राझिलमध्ये ४ लाख ७ हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या मॅक्सिकोमध्ये आतापर्यंत २ लाख १७ हजार कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या