नरेंद्र मोदी यांच्याच हातात देश सुरक्षित – रावसाहेब दानवे

raosaheb-danve

सोलापूर- ( प्रतिनिधी ) – आज देशामध्ये भयानक युद्धजन्य परिस्थिती आहे. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात आता देश सुरक्षित राहू शकतो अशी तमाम देशवासीयांची भावना आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि मोदींचे हात बळकट करा असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.

सोमवारी हेरिटेज येथे महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष दानवे बोलत होते. दानवे म्हणाले, राज्यात युती अभेद्य आहे ती कोणीसुद्धा मोडू शकणार नाही हे कोल्हापुरातील विराट महामेळाव्याने दाखवून दिले आहे. करवीर नगरीच्या महालक्ष्मीने आशीर्वाद दिला आहे. महालक्ष्मीच्या साक्षीने राज्यात महायुतीच्या सर्व उमेदवार निवडून येऊन देशात पुन्हा युतीची सत्ता येऊन पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील. आज देशामध्ये भयंकर युद्धजन्य परिस्थिती आहे. अतिरेक्यांनी सैनिकांवर केलेल्या हल्ल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले मात्र पंतप्रधान मोदी यांनी संयमाने सर्व परिस्थिती हाताळत करार जवाब दिला आहे. ४० सैनिकांच्या बदल्यात ३०० अतिरेक्यांचा खात्मा केला हे फक्त मोदीच करू शकले. त्यामुळे मोदींच्या होतीच देश सुरक्षित राहणार आहे अशी भावना देशवासियांमध्ये आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

यापूर्वीच्या सरकारने सर्व क्षेत्रात सुमार कामगिरी केली आहे. दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यासाठी लावलेले निकष बदलण्याची मागणी आम्ही अनेकदा केली मात्र त्यांनी दाखल घेतली नाही. मात्र आमची सत्ता येताच आणेवारीची पद्धत बदलत शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला आहे. शासनाच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली . नुसती आश्वासने न देता ती कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम पंतप्रधानांनी केले या विकासकामांच्या जोरावरच मते मागत आहोत. त्यामुळे जनता विकासरूपी महायुतीच्या पाठीशी राहील असा विश्वासही दानवे यांनी बोलून दाखविला. भाजप शिवसेना जातीयवादी असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातो. शरद पवार , मायावती, फारुख अब्दुल्ला यांना जातीवादी असल्याचा आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्याज्यावेळी यांना भाजप सेनेची मदत लागली त्यावेळी त्यांनी आमची मदत घेतली,आमच्या पंगतीला बसून जेवले आता मात्र जातीवादाचा आरोप करत आहेत त्यांची तोंडे आमच्या पंगतीला जेऊन खरकटी झाली आहेत त्यामुळे त्यांना असे आरोप करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा टोलासुद्धा दानवे यांनी लगावला.

या मेळाव्याला पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्हे,प्रदेश निरीक्षक रघुनाथ कुलकर्णी, आमदार प्रशांत परिचारक, शिवसेनेचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत, प्रा. शिवाजी सावंत , सेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे, गणेश वानकर, शहराध्यक्ष हरिभाऊ चौगुले, सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोगे पाटील, पुरुषोत्तम बरडे,भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, उमा खापरे, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, सभागृह नेते संजय कोळी, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे , वंदना गायकवाड, संगीता जाधव, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह नगरसेवक देवेन्द्र कोठे, प्रथमेश कोठे, अमोल शिंदे, विनायक कोंड्याला, मनोज शेजवाल , उमेश गायकवाड, राजकुमार हंचाटे, शशिकांत कैंची, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे , माजी नगरसेविका मोहिनी पतकी , उज्वला येलूरे यांच्यासह भाजप शिवसेना युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.