टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ३१८ धावांनी विजय; रहाणे, बुमराहचे शानदार प्रदर्शन

टीम महाराष्ट्र देशा : वेस्ट इंडीज विरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताने 318 धावांनी जिंकला आहे. या विजयासह भारतीय संघाने मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं शतक करून भारताला मोठी आघाड़ी मिळवून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीच्या जोरावर विंडीजला १०० धावांत बाद करत भारताने हा सामना खिशात घातला.

भारतीय संघाने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ४१९ धावांचं मोठ आव्हान ठेवलं होतं. याचा पाठलाग करताना विंडीजच्या फलंदाजांना खेळपट्टीवर पाय रोवता आला नाही. जसप्रीत बुमराहच्या शानदार गोलंदाजीसमोर त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी नांगी टाकली. शेवटी केमार रोचने थोडीशी फटकेबाजी केली. परंतु भारतीय गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीमुळे वेस्ट इंडीजचा डाव अवघ्या 100 धावांवर आटोपला.

भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराहनं अवघ्या ७ धावांत ५ गडी बाद केले. त्याशिवाय पहिल्या डावात ५ विकेट घेणाऱ्या इशांत शर्मानं ३१ धावा देत ३ गडी बाद केले. तर मोहम्मद शमीनं २ गडी बाद केले. वेस्ट इंडीजकडून केमार रोचने ३८ तर कमिन्सने १९ धावा केल्या. गोलंदाजांच्या या शानदार कामगिरीमुळे भारताला वेस्ट इंडीजवर ३१८ धावांनी विजय मिळवण्यात यश मिळाले.

दरम्यान, भारतीय संघाने आपला दुसरा डाव सात बाद ३४३ धावांवर घोषित केला. यात अजिंक्य रहाणेने शानदार फटकेबाजी करत शतकी खेळी केली. त्याला हनुमा विहारीने ९३ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. तसेच कर्णधार विराट कोहलीने ही ५१ धावांचं योगदान दिले.