श्रीलंकेवर मात करत भारताने पटकावले विजेतेपद

भारताने श्रीलंकेवर मात करत अंडर १९ आशिया चषकावर नाव कोरले आहे. भारताचा कर्णधार अभिषेक शर्माच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने लंकेवर ३४ धावांनी विजय मिळवला असून या कामगिरीसाठी शर्माला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.

श्रीलंकेत अंडर-१९ आशिया चषक पार पडले. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ८ गडी गमावत २७३ धावा केल्या. हिमांशू राणाने ७१ तर शुभम गिलने ७० धावांची खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला. कर्णधार अभिषेक शर्माने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन २९ धावांची खेळी केली. सलमान खान २६ धावांवर बाद झाला त्यावेळी भारत ५ बाद २४४ धावांवर होता. मात्र त्यानंतर प्रियम गर्ग आणि हेत पटेल हे दोघेही लागोपाठ बाद झाल्याने भारताची अवस्था ७ बाद २४५ अशी झाली. तळाचा फलंदाज कमलेश नागरकोटीने २३ धावांची महत्त्वाची खेळी करत भारताला २७३ धावांची मजल गाठून दिली.

घरच्या मैदानात खेळणा-या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात फारशी चांगली नव्हती. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेची सलामीची जोडी संघाच्या २७ धावा झाल्या असतानाच फोडली. मात्र त्यानंतर रेवेन केलीने ६२ आणि तिस-या क्रमांकावर आलेल्या हासिथ बोयागोडाने ३७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी जमली असताना कर्णधार अभिषेक शर्माने भारताला मोठे यश मिळवून दिले. शर्माने बोयागोडाला बाद करत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. यानंतर शर्माने अर्धशतक ठोकणा-या कामिंदू मेडिंसचीही विकेट घेतली. शर्माने ३७ धावांमध्ये ४ विकेट घेतल्या. तर राहुल चाहरने तीन विकेट घेतल्या. भारतीय गोलंदाजांच्या अचूक मा-यापुढे श्रीलंकेचा संघ २३९ धावांवर गारद झाला. सामन्यात २९ धावा आणि ४ विकेट घेणारा अभिषेक शर्मा सामनावीर ठरला. तर हिमांशू राणाला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.