भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

कोलंबो – कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्या शतकांनंतर गोलंदाजांनी केलेल्या गोलंदाजीच्या बळावर भारताने चौथ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 168 धावांनी दणदणीत विजय मिळविला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 4-0 अशी आघाडी मिळवली आहे. 376 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा अख्खा डाव 207 धावांत गडगडला.

विराटने 96 चेंडूंत 17 चौकार आणि दोन षटकारांसह 131 धावांची, तर रोहितनं 88 चेंडूंत 11 चौकार आणि तीन षटकारांसह 104 धावांची खेळी केली. मनीष पांडे आणि महेंद्रसिंग धोनीने सहाव्या विकेटसाठी 101 धावांची  भागीदारी केली. पांडे 50, तर धोनी 49 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केले.

विराट कोहली आणि रोहित शर्माने केले हे नवे विक्रम
श्रीलंका विरुद्ध भारत चौथा एकदिवसीय सामना अनेक कारणांसाठी विक्रमी ठरला आहे. हा सामना धोनीचा वन डे कारकिर्दीतील ३०० वा सामना होता. त्याच बरोबर या सामन्यात लसिथ मलिंगाने आपल्या वन डे कारकिर्दीतील ३०० विकेट्स ही पूर्ण केल्या पण खऱ्या अर्थाने हा सामना जर कोणी गाजवला असेल तर ते भारतीय संघाचे कर्णधार आणि उप-कर्णधार म्हणजे रोहित आणि विराट यांनी.

statistical-analysis-of-kohli-and-rohit-sharma-s-inning

विराट कोहलीचे विक्रम:

१. विराट कोहलीचे श्रीलंकेत वनडे सरासरी ४१ची आहे. ही त्याची कोणत्याही देशातील सर्वात कमी वनडे सरासरी आहे.

२. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत आता कोहली अव्व्ल स्थानी आहे. त्याने १७ शतके केली आहेत आणि आज त्याने गांगुलीच्या १६ शतकाच्या कामगिरीला मागे टाकले आहे.

३. कोहली-शर्मा जोडीने तिसऱ्यांदा वनडे सामन्यांत द्विशतकी भागीदारी केली आहे. असा विक्रम करणारी जगातील केवळ ४थी तर तिसरी भारतीय जोडी.

४. कोहली द्विशतकी भागीदारीचा १०व्यांदा भाग बनला आहे. हा एक विश्वविक्रम असून उपल थरंगाने अशी कामगिरी ७वेळा केली आहे.

५. कोहलीने ४थ्यांदा ८० चेंडूच्या आत शतकी खेळी केली आहे. जयसूर्या/ डिव्हिलिअर्स (८) आणि सेहवाग(७) हे कोहलीच्या पुढे आहेत.

६. कोहली-शर्मा जोडीने आजपर्यत ३०० धावांची भागीदारी केली आहे. अशी करणारी ही ९वी भारतीय जोडी आहे.

७. कोहलीची श्रीलंकेविरुद्धची ही ७वी शतकी खेळी असून केवळ सचिन तेंडुलकरने लंकेविरुद्ध ९ शतकी खेळी केल्या आहेत.

८.वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली (२८ ) तिसऱ्या स्थानी. सचिन(४९), पॉन्टिंग(३०) यांनी केवळ कोहलीपेक्षा जास्त शतकी खेळी केल्या आहेत.

९. कोहलीने परदेशी भूमीवर १७वे वनडे शतक केले आहे. तर लंकेतील ३रे शतक आहे.

१०. प्रत्येक शतकासाठी कोहलीला वनडेमध्ये ३ डाव लागतात. यासाठी सचिनला ९ तर पॉन्टिंगला १२ डाव लागत असत.

रोहित शर्माचे विक्रम:

१. रोहित शर्माची ही सर्वात छोटी शतकी खेळी आहे. तो १०४ धावांवर बाद झाला.

२. श्रीलंकेच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध लगातार २ शतक करणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

३. कारकिर्दीच्या पहिल्या १०० वनडेमध्ये रोहितने फक्त २ शतकी खेळी केल्या होत्या तर पुढील ६२ सामन्यात त्याने ११ शतके केली आहेत.

४. रोहित शर्माने केवळ दुसऱ्यांदा १०० पेक्षा कमी चेंडूत शतकी खेळी केली आहे.

५. पाठोपाठच्या दोन सामन्यात शतक करण्याची रोहितची ही तिसरी वेळ होती. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय. विराटने अशी कामगिरी ४ वेळा केली आहे.