स्पेनला मात देत भारताची ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक

लखनऊ: ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत यजमान भारताने स्पेनवर २-१ ने मात केली आहे. अटीतटीच्या झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत विजय मिळवत ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने मजल मारली आहे. सामन्याच्या ५५ व्या मिनिटापर्यंत पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने शेवटच्या १५ मिनिटांत आपला खेळ उंचावला आणि सिमरनजीत सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर स्पेनला मात दिली. आता उपांत्य लढतीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल.

सामन्याच्या चौथ्या आणि आठव्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण भारतीय संघाला त्याचा फायदा उठवता आला नाही. दरम्यान २४ व्या मिनिटाला गोल करून स्पेनने सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर मध्यंतरापर्यंत भारतीय संघ ०-१ असा पिछाडीवर होता.

दुसऱया सत्रात भारत गोल करण्यासाठी भारतीय संघाने खूप प्रयत्न केले. पण स्पेनची बचावफळी भेदून काढण्यात भारताला यश येत नव्हते. सामन्याच्या ४६ व्या मिनिटाला भारताकडे पेनल्टी कॉर्नरची संधी होती, पण त्यातही भारताच्या पदरात अपयशच पडले. अखेर सामन्याच्या ५६ व्या मिनिटाला सिमरनजीत सिंगने कोणतीही चूक न करता पेनल्टी कॉर्नरचा फायदा उचलत भारतासाठी पहिला गोल नोंदवला आणि बरोबरी साधून दिली. मग हरमप्रीत सिंगने भारतासाठी दुसरा आणि निर्णायक गोल करून संघाला मोठा विजय मिळवून दिला.