स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी काळाची गरज – रामदास आठवले

ramdas athawale vidharbh

मुंबई  : विदर्भ राज्य झालेच पाहिजे ही वैदर्भीय जनतेची तीव्र भावना झाली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक आर्थिक विकासाच्या दृष्टीने स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी काळाची गरज आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या 18 डिसेंबर रोजी विदर्भ राज्य परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

रिपाइंच्या वतीने आयोजित स्वतंत्र विदर्भ राज्य परिषद येत्या दि .१८ डिसेंबर २०१७ ला विदर्भ राज्य परिषद दु. १२.३०वा. रामगोपाल माहेश्वरी सांस्कृतिक सभागृह, झांशी राणी चौक; सीताबर्डी नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे . या परिषदेचे उदघाटन रामदास आठवले आठवले यांच्या हस्ते होणार असून या परिषदेच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भूपेश थू्लकर हे राहतील.

या परिषदेला विविध पक्षाचे विदर्भवादी नेते व पक्षाचे ज्येष्ठ नेते यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेत रिपब्लिकन पक्षाचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. विदर्भातील जनतेच्या प्रश्नावर व विदर्भ राज्यासाठी विदर्भव्यापी जनजागरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या परिषदेला मोठ्या संख्येने विदर्भवादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुपेश थुलकर यांनी कळविले आहे.