fbpx

GST- जीएसटी दरांच्या माहितीसाठी स्वतंत्र अ‍ॅप

जीएसटी दरांवरून सुरू असणारा गोंधळ टाळण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयातर्फे स्वतंत्र जीएसटी रेट फाइंडर अ‍ॅप उपलब्ध करण्यात आले आहे.

देशात दिनांक १ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी लागू करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकच नव्हे तर व्यापारी/सेवा पुरवठादार संभ्रमात पडले आहेत. एखाद्या वस्तू वा सेवेवर नेमका किती कर आहे? याबाबतची अचूक माहिती बहुतांश जणांना नसल्यामुळे सर्वाधीक गोंधळाचे वातावरण निर्मित झाले आहे. या पार्श्‍वभूमिवर केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अप्रत्यक्ष कर शाखेतर्फे जीएसटी रेट फाइंडर हे अ‍ॅप सादर करण्यात आले आहे. प्रारंभी याला अँड्रॉइडधारकांसाठी लाँच करण्यात आले असले तरी लवकरच आयओएस प्रणालीसाठीही ते उपलब्ध करण्यात येणार आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे ते ऑफलाईन असतांनाही वापरता येईल.

जीएसटी अ‍ॅपमध्ये देशात विकली जाणारी कोणतीही वस्तू तसेच सेवा आदींवर नेमका किती वस्तू व सेवा कर आहे? याची अचूक माहिती मिळेल. यासाठी सर्चची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे. यामुळे संबंधीत वस्तू वा सेवेवर करण्यात येणार्‍या जीएसटी आकारणीची माहिती मिळेल. याचा अर्थातच ग्राहक आणि व्यापारी या दोघांना लाभ होईल. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यातून जीएसटीच्या नावाखाली होणारी लूट थांबविता येईल. या अ‍ॅपवरून तात्काळ कुणीही जीएसटीच्या दराबाबत खातरजमा करू शकतो. खरं तर जीएसटीबाबत माहिती देण्यासाठी अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी अनेक अ‍ॅप सादर करण्यात आले आहेत. मात्र जीएसटी रेट फाइंडर या अ‍ॅपमध्ये अतिशय विस्तृत आणि अचूक माहिती असल्यामुळे ते सर्वाधीक उपयुक्त ठरू शकते. दरम्यान, केंद्रीय अबकारी व उत्पादन शुल्क बोर्डाच्या संकेतस्थळावरदेखील या अ‍ॅपमधील सर्व माहिती देण्यात आली आहे.