कांद्याचे दर सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणार

दिवाळीच्या दिवसांमध्ये कांद्याचे दर सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकच्या लासलगावमध्ये कांद्याचे दर वाढताना दिसत आहेत. दिवाळीच्या कालावधीत लासलगावसहित कांद्याचे व्यवहार करणाऱ्या इतर बाजारपेठा आठवडाभर बंद राहणार आहेत. त्यामुळे घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर वाढवले आहेत.

दिवाळीपर्यंत हे दर आणखी वाढतील, असा अंदाज घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत वाढत असल्याने कांद्याचे दर वाढले आहेत. लासलगाव एपीएमसीमध्ये गेल्या १० दिवसांमध्ये कांद्याच्या दरांमध्ये सरासरी ८० टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

घाऊक बाजारात कांद्याचे दर वाढल्याचा परिणाम काही दिवसांमध्ये किरकोळ बाजारातील विक्रीवरही पाहायला मिळेल. नाशिकमधील किरकोळ बाजारात सध्या कांद्याचा दर ३० रुपये प्रति किलो आहे. थोड्याच दिवसांमध्ये हा दर ३५ रुपये प्रति किलोवर जाऊ शकतो. त्यामुळे राज्याच्या इतर भागांसह देशभरात कांद्याचा दर ५० रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.