अविश्वसनीय! चॅम्पियन संघाप्रमाणे बाजी पलटवत विजय मिळवला ; द्रविडकडून कौतुकाची थाप

rahul dravid

श्रीलंका : भारताची ‘युवा’ टीम सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने विजय मिळवला. दुसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली.

भारताला विजयासाठी 276 धावांची गरज असताना पहिल्या आणि मधल्या फळीतील आघाडीचे बॅट्समन स्वस्तात माघारी परतले. 193 धावांवर सात विकेट्स असताना विजयाची आशा मावळली होती. हातात ३ विकेट्स असताना ८३ धावांची गरज होती. अशात दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमारने केलेली भागीदारी ही निर्णायक ठरली. या दोन्ही खेळाडूंनी संयमी खेळी केली आणि श्रीलंकेच्या घशातून हा विजय खेचून आणला.

संघाच्या या खेळाने खुश झालेले प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या खेळाडूंना शाबासकी दिली आहे. तसेच त्यांनी म्हटले की, ‘तुम्ही चॅम्पियन संघाप्रमाणे बाजी पलटवत विजय मिळवला.’ बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये द्रविड ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंचे कौतुक करताना दिसत आहेत. ‘निकालाच्या दृष्टीने आपण अपेक्षित कामगिरी केली. पण हा विजय अविश्वसनीय होता. आपण या सामन्यात पराभूत जरी झालो असतो, तरी सामन्यात केलेला संघर्ष शानदार ठरला असता.’

पुढे द्रविड म्हणाले, ‘श्रीलंका पुनरागमन करेल, हे आपल्याला माहित होते. त्यांचा आपल्याला सन्मान करायला पाहिजे आणि तेही एक आंतरराष्ट्रीय संघ असल्याने त्यांच्याकडून कडव्या प्रतिकाराची अपेक्षा होती. आपल्या खेळाडूंनी प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढला.’दीपक चहरने भुवीसोबत चांगली भागीदारी केली. यावर द्रविड म्हणाले की, ‘वैयक्तिक खेळावर चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही. मात्र, सामन्यात काही शानदार वैयक्तिक प्रदर्शन पाहण्यास मिळाले हे नक्कीच. या सामन्यात प्रत्येक खेळाडूचे योगदान आहे. गोलंदाजीतही संघाची कामगिरी शानदार ठरली.’

महत्त्वाच्या बातम्या

IMP