‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला; तब्बल 61 गावांत कडक टाळेबंदी लागू

'या' जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला; तब्बल 61 गावांत कडक टाळेबंदी लागू

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांत कडक टाळेबंदी लागू करण्यात आली असून कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. पुणे विभागात ससून हेच एकमेव सर्वसाधारण रुग्णालय असल्यानं अहमदनगरमधील अनेक कोरोना रुग्ण पुढील उपचारासाठी याच ससून रुग्णालयात येत आहेत.

सध्या ससूनमध्ये उपचार घेत असलेल्या एकंदर रुग्णांपैकी 40 टक्के रुग्ण नगर जिल्ह्यातील असल्याचं निरीक्षण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नोंदवलं आहे.गेल्या आठवड्यापर्यंत नगर जिल्ह्यात कोरोनाचे दैनंदिन 600 पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत होते मात्र आता त्यात घट झाली असून सध्या प्रतिदिन किमान 400 रुग्ण सापडत आहेत, त्यापैकी बहुसंख्य रुग्ण पुढील उपचारासाठी पुण्याची वाट धरत आहेत.

दरम्यान, अनंत चतुर्दशीनंतर 15 दिवसांत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होण्याची भिती सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आली होती.मात्र गणेश विसर्जनानंतर साधारणपणे 17 दिवसांत राज्यात काल कोविड-19 च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ न झाल्याचं दिलासादायक चित्र दिसून येत आहे. काल राज्यात बरे झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोनाच्या नवबाधित रुग्णांची संख्या 113 नं जास्त राहिलेली दिसून आली. राज्यात काल 2,763 रुग्ण बरे झाले असून 2876 नवीन बाधित आढळून आले.राज्यात आतापर्यंत या आजारातून बरे झालेल्यांची संख्या 63,91,662 झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचं राज्याचं प्रमाण 97.32 टक्के आहे.

महत्त्वाच्या बातम्या