अडचणीत वाढ! पूजा प्रकरणी संजय राठोड यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका

sanjay rathod puja

मुंबई : पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येने राज्यातील राजकारण पार ढवळून निघाले आहे. संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष देऊनही हे प्रकरण शांत होण्याचे नावच घेत नाहीये. आता याप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची विनंती करणारी फौजदारी रिट याचिका समाजिक कार्यकर्ता हेमंत पाटील यांनी केली आहे. यात पुणे पोलिसांच्या तपासावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. ही याचिका येत्या काही दिवसांत सुनावणीला येण्याची शक्यता आहे.

याचिकेत म्हटले आहे की, पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याचा तपास होणे गरजेचे आहे. या मृत्यूमागे संजय राठोड आणि अरुण राठोड नावाच्या व्यक्तीचा सहभाग असल्याचे दिसत आहे. मात्र, राजकीय दबावामुळे पुण्यातील वानवडी पोलीस निष्पक्ष तपास करत नाहीयेत. त्यामुळे पोलिसांना या दोघांविरोधात एफआयआर नोंदवून तपास करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेत या दोघांसह राज्याचे पोलीस महासंचालक, पुणे पोलीस आयुक्त आणि वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरण काही करता शांत होताना दिसत नाहीये. संजय राठोड त्यांच्या राजीनाम्यासाठी मागे लागलेल्या विरोधकांना घेरण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला असल्याचे दिसते. मागील काही दिवसांपासून सतत सत्ताधाऱ्यांना गोचीत पकडण्याचे काम विरोधकांनी केले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राठोड यांना पदावरून दूर व्हावं लागलं. त्यानंतर आता राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीच स्पष्टता नसताना हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे.

महत्त्वाच्या बातम्या