‘मुंबईच्या धर्तीवर पुण्यात ही व्यापाऱ्यांना वेळ वाढवून द्या’ ; मनसे आक्रमक

raj thackrey

पुणे : देशात मुख्यतः महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम दिसून आले. यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस कडक निर्बंध लावण्यात आले. तर, सध्या निर्बंधांना शिथिलता देण्यात आली असून आणखी सूट मिळावी अशी मागणी करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय दिला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,सोलापूर, अहमदनगर, पालघर,बीड, रायगड हे 11 जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. निर्बंध कायम असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुण्याचा समावेश आहे. दरम्यान राज्य सरकारने लादलेल्या वेळेच्या बंधनांविरोधात पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने आज शहरातील विविध ठिकाणी घंटानाद करीत आंदोलन करण्यात आले. शहरातील व्यापारी यावेळी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग झाले होते. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, फर्गसन रस्ता, गणेश पेठ, बोहरी आळी, शिवाजी रस्ता, टिंबर मार्केट, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता अशा सर्व प्रमुख रस्त्यांवर उतरत थाळी, घंटा वाजवीत व्यापा-यांनी सरकारचा निषेध केला.

दरम्यान यावर आता विविध पक्षांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्वीट करून व्यापाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. ‘जिल्हा निहाय कोरोना चे निर्बंध न लावता, तालुका व शहर निहाय हे नियम असावे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोरोना संख्या मर्यादित असताना सुद्धा पूर्ण जिल्ह्याला कडक निर्बंध लावणे चुकीचे आहे.

पुणे शहरात कोरोना रुग्ण संख्या पूर्ण जुलै महिना नियंत्रणात असताना सुद्धा अजूनही लहान मोठ्या व्यापाऱ्यांना व्यवसायाची वेळ वाढून भेटत नाही. पुण्यातील सर्व व्यावसायिकांच्या मागणीचा विचार करून मुंबईच्या धर्तीवर पुण्यात ही व्यवसायाची वेळ वाढवून द्यावी.’ अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे ट्वीट करून केली आहे.

महत्वाच्या बातम्या