कांदा साठवणूक मर्यादा वाढवावी; यासंदर्भात उद्धव ठाकरे यांचे केंद्राला पत्र

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा ही २५ मे.टनावरून वाढवून १५०० मे.टन एवढी करण्यात यावी, अशी मागणी करणारे एक पत्र केंद्र सरकारकडे पाठवले आहे. तसे पत्र त्यांनी केंद्रीयग्राहक संरक्षण, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांना पाठवले आहे.

केंद्र शासनाने दिनांक २९ ऑक्टोबर २०२० च्या सुचनेप्रमाणे एपीएमसीतील कांदा खरेदीच्या दिनांकापासून ग्रेडींग, पॅकेजिंगसाठी तीन दिवसांचा कालावधी दिला आहे. हा कालावधीही खूप कमी असून तो सात दिवसांचा करण्यात यावा, असे देखील पत्रात म्हटले आहे.

केंद्रशासनाने २३ ऑक्टोबर २०२० रोजी जीवनावश्यक वस्तू कायद्यातील नियंत्रण आदेशात सुधारणा करून घाऊक कांदा व्यापाऱ्यांसाठी २५ मे.टन तर किरकोळ कांदा व्यापाऱ्यांसाठी फक्त दोन मे.टनापर्यंत साठवणूकचे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा व्यापारी दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रब्बी कांदा उत्पादनात महाराष्ट्र देशातील अग्रगण्य राज्य असून एकूण उत्पादनाच्या १/३ उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. देशाच्या एकूण कांदा निर्यातीमध्ये ही महाराष्ट्राचा हिस्सा ८० टक्के असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे. यासंबंधी अधिक माहिती देतांना मुख्यमंत्र्यांनी मागील हंगामात रब्बी  हंगामातील कांदा उत्पादनाचे क्षेत्र वाढले असून अंदाजे १०० लाख मे.टन कांद्याचे उत्पादन झाल्याची माहिती दिली आहे.परिणामी साठवणूक क्षमता वाढावी यासठी ठाकरे यांनी हे पत्र दिले आहे.

महत्वाच्या बातम्या