अनिल देशमुखांच्या घरावर आयकर विभागाचा छापा 

anil DESHMUKH

नागपूर : येथील सिव्हिल लाईन परिसरातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. यापूर्वी ईडी, सीबीआय आणि आता आयकर विभागानेही देशमुखांच्या घरावर छापा टाकल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सचिन वाझे प्रकरणातून आता अनेक खुलासे बाहेर येत आहेत. अनिल देशमुखांनी २० कोटींची लाच स्वीकारल्याचा आरोपही नुकताच सचिन वाझेनी इडीकडे केला आहे.

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसूलीचे आरोप झाले. त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनंतर एपीआय सचिन वाझेला अटक झाली. सचिन वाझेंच्या कथित अँटिलिया स्फोटकं प्रकरणानंतर अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त यांचीही बदली झाली. देखमुख यांनी राजीनामा दिल्यापासून या प्रकरणी अनेक आरोप होत आहेत. या आरोपानुसार सीबीआय, ईडी आणि आता आयकर विभागही देशमुख यांच्या घराची तपासणी करत आहे.

देशमुख यांच्यावरील मनी लॉण्ड्रिंगच्या आरोपानंतर ईडीने त्यांच्या मुंबई व नागपूर येथील घरावर छापे टाकले होते. त्यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आले आहे, मात्र अद्यापपर्यंत ते हजर झाले नाही. या तपास यंत्रणा देशमुख विरोधात पुरावे गोळा करत आहेत. आयकर विभागाने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला तेव्हा त्यांची पत्नी व घरातील कर्मचारी घरात होती. त्यांची दोन्हीही मुले यावेळी घरी नव्हती.

महत्त्वाच्या बातम्या