महापालिकेच्या बांधकाम परवानगीसाठी आता कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची अट

औरंगाबाद: शहरात सध्या कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून कचराकोंडीमुळे नागरिकांसह प्रशासन देखील त्रस्त आहे. कचराकोंडीवर उपाय शोधण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. असाच एक उपाय पालिकेच्या नगररचना विभागाकडून काढला आहे.

पालिकेच्या नगररचना विभागाकडून वैयक्तिक घर बांधणीसह हाऊसिंग सोसायटी, अपार्टमेंटच्या बांधकामाला विभागाची परवानगी घ्यावी लागते. आता बांधकामाला परवानगी देताना कचऱ्यावरील प्रक्रियेचा मुद्दा तपासून पाहिला जाणार आहे. ज्या हाऊसिंग सोसायटींमधून रोज शंभर किलो किंवा त्यापेक्षा जास्त कचरा निघतो त्या हाऊसिंग सोसायटींना कचऱ्यावरील प्रक्रियेची सक्ती करूनच कचरा प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्याची अट टाकून यापुढे बांधकाम परवानगी दिली जाणार आहे. आणि जोपर्यंत कचरा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत सर्व विभागप्रमुखांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना आपली कार्यालये सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे.