वनविभागात औषधनिर्माण पदवीधारकांना समाविष्ट करा- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य वन विभागातील पदांच्या भरती परीक्षेसाठी औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या पदवीधारकांना पात्र करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वन विभागातील विविध पदांसाठी लोकसेवा आयोगामार्फत सन २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षा दरम्यान असे निदर्शनास आले आहे की, वनस्पतिशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, सांख्यिकी यांच्यासह विद्युत, संगणक, स्थापत्य, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवीधारकांचा समावेश या परीक्षेत करण्यात आला होता. मात्र यामध्ये औषध निर्माण शास्त्र विषयातील पदवीधरांना समाविष्ट करण्यात आले नाही.

त्यामुळे गणित, रसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र आदी विषयांच्या अभ्यासक्रमात असलेल्या औषध निर्माणशास्त्र पदवीधारकांना या सेवेत रुजू होण्यापासून वंचित राहावे लागले. तेव्हा या शाखेला देखील वनविभागाच्या पद भरती परीक्षेकरिता शैक्षणिक पात्रतेत समाविष्ट करण्यासाठी पदवीधर आ. सतीश चव्हाण यांची भेट घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.

राज्यातील जवळपास १२५ महाविद्यालयात पदवी व पदविका अभ्यासक्रम शिकवला जातो. यातून सुमारे २० ते २५ हजार विद्यार्थी औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमात पदवीधर होतात. या तुलनेत नोकरीची संधी फार कमी असल्याने वनसेवा विभागातील विविध पदांवर औषध निर्माणशास्त्र पदवीधारकांना पात्र असून देखील संधी मिळत नाही. तेव्हा औषध निर्माणशास्त्र पदवी धारकांचा वनविभागातील परीक्षेत बसण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अमोल दांडगे, स्नेहलकुमार राठोड, भरत सिंग दधरे, यांच्या वतीने करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या