ब्रिटीश कौन्सिलच्या पुण्यातील नव्या सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन

सदस्यांना ऑनलाईन लायब्ररीचाही घेता येणार अनुभव

 

पुणे : ब्रिटीश कौन्सिलने नवीन सांस्कृतिक केंद्र शहरातील शिवाजीनगर भागात रामसुख हाऊस येथे उघडल्याचे आज जाहीर केले. हे केंद्र ५००० चौरस फूट प्रशस्त जागेत उभारले असून त्यात ब्रिटीश कौन्सिल ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण सज्ज सह-शिक्षण केंद्र आणि कॅफे अशा सुविधा आहेत. यंदाचे वर्ष युके-इंडिया इयर ऑफ कल्चर म्हणून साजरे होणार आहे.
ब्रिटीश कौन्सिल लायब्ररीचे सध्याचे सदस्यत्व नव्या ग्रंथालयात आपोआप हस्तांतर होणार आहे. तसेच सभासदांना अनेक नव्या सुधारित सुविधांचा लाभ मिळणार आहे. विद्यमान सदस्यांना येथील कार्यक्रमांचा, तसेच ऑनलाईन लायब्ररीचाही अनुभव घेता येईल. सभासद स्वतःची पुस्तके आणि लॅपटॉप घेऊन लायब्ररीत बसून वाचन व अभ्यास करु शकतील. नवीन ब्रिटीश लायब्ररीत १०००० हून अधिक पुस्तके, डीव्हीडी, युकेतील वृत्तपत्रे व मासिके उपलब्ध आहेत. तसेच वेगवेगळ्या विषयांवरील ११५००० पुस्तके व १४००० जर्नल्स डिजीटल माध्यमातून वाचण्याची सोय आहे. सदस्यांना ब्रिटीश कौन्सिलच्या ऑनलाईन साधनसंपत्तीचाही वापर करता येईल ज्यामध्ये ४००० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रे व नियतकालिके, स्वतंत्र चित्रपट, मुलांसाठी अध्ययन खेळ, सॉफ्टवेअर प्रशिक्षण, कॉमिक्स, ऑडिओ बुक्स व जेएसटीओआरच्या शैक्षणिक पुस्तिकांचा समावेश आहे. त्याबरोबर यंग लर्नर्स झोनमध्ये विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच संवादात्मक पुस्तके पुरवली जाणार आहेत.

सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन करताना ब्रिटीश कौन्सिलचे भारतातील ओबीई डायरेक्टर ॲलन गेम्मेल म्हणाले, “पुण्यातील सुधारित ब्रिटीश कौन्सिल केंद्र आपल्या सदस्यांना खूप काही देऊ करत आहे. भारत व युनायटेड किंग्डम यांच्यातील ७० वर्षांचे संबंध साजरे करणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे सांस्कृतिक केंद्र ठरावे, या हेतूने पुण्यातील हे केंद्र पुनर्संकल्पित करण्यात आले आहे. आमचे जागतिक दर्जाचे ग्रंथालयही आता अधिक अद्ययावत झाले असून तेथे इंटरनेट व तंत्रज्ञानप्रेमी नव्या पिढीसाठी अफाट डिजीटल साधनसामग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे नवे केंद्र आमच्या सांस्कृतिक संबंध कामाचा आकर्षक केंद्रबिंदू ठरेल आणि उत्पादने व सेवांची संपूर्ण श्रेणी पुरवून लोकांना स्वतःशी जोडण्यात साह्यभूत ठरेल.”