भाजप व संघाला बदनाम करण्याचा डाव- मा.गो. वैद्य

नागपूर : आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन भाजप आणि संघाला बदनाम करण्यासाठी भीमा – कोरेगावचे षडयंत्र रचण्यात आले आहे. महाराष्ट्रात जे काही घडले त्यात राजकीय डाव असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत मा.गो.वैद्य यांनी केले. ते आज, शनिवारी प्रसिद्धी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.यासंदर्भात वैद्य म्हणाले की, हल्ली वयोमानानुसार फार कुठे प्रवास करीत नाही. परंतु, वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाहिन्यांवर जे काही पाहिले,ऐकले त्यावरून हे सर्व संघ आणि भाजपला बदनामकरण्यासाठी कुभांड रचण्यात आले असावे असे वाटते. ज्यांनी कुणी हे घडवले त्यांनी2019 च्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवल्या असाव्यात असे वैद्य यांनी सांगितले. तसेच भीमा-कोरेगाव दंगलीत संभाजी भिडे यांचे नाव गोवणे आश्चर्यकारक वाटते. भीमा-कोरेगाव येथे जो प्रकार घडला त्यात भिडेंचा हात असेल असे वाटत नाही. तरी देखील त्यांचे नाव वारंवार पुढे आणले जाते आहे.त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरजही वैद्य यांनी यावेळी व्यक्त केली.