नवी दिल्ली – कोविड आजारामुळे पालक गमावलेल्या अनाथ मुलांसाठी उत्तराखंड राज्य सरकारनं मुख्यमंत्री वात्सल्य योजना जाहीर केल्याची घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत अशा अनाथ मुलांच्या पालन पोषणासह त्यांचं शिक्षण आणि वय वर्ष 21 पूर्ण होईपर्यंत त्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय दरमहा तीन हजार रुपये निर्वाह भत्ता म्हणून दिला जाणार आहे. या शिवाय अशा मुलांची पैतृक मालमत्ता ते सज्ञान होईपर्यंत सुरक्षित रहावी, कोणीही त्याची विक्री करू नये यासाठी कायदा करण्यात येणार आहे. तसंच सरकारी नोकरीमध्ये प्राधान्याने संधी मिळावी म्हणून पाच टक्के जागा आरक्षित करण्यात येतील असंही मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी सांगितलं.
दुसरीकडे मध्य प्रदेश सरकारने कोरोना कालावधीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पीडित व्यक्तींच्या कुटुंबांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गुरुवारी सांगितले की ज्यांच्या कुटुंबात पालकांचा मृत्यू झाला आहे,त्या कुटुंबातील मुलांना महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे.
मध्य प्रदेशात कोरोनामुळे उध्वस्त झालेल्या अशा कुटुंबातील एखादा सदस्य असल्यास किंवा एखादी महिला जिच्या नवऱ्याचे निधन झाले आहे त्याना सुद्धा आम्ही मदत करणार आहोत. अशा व्यक्तींना जर काही व्यवसाय करायचा असेल तर सरकारच्या हमीवर त्यांना व्याजाशिवाय कर्ज दिले जाईल, जेणेकरून ते आपला व्यवसाय करू शकतील.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील आता एक अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला आहे. ‘ज्या लहान मुलांचे आई आणि वडील दोघांचेही कोरोनाने निधन झाले आहे किंवा एकाचा आधीच मृत्यू झाला असेल आणि एकाचा कोरोनाने मृत्यू झाला तर त्यांना महिन्याला अडीच हजार रुपये पेन्शन मिळेल. ही पेन्शन ती मुलं 25 वर्षांची होईपर्यंत देण्यात येईल. यासोबतच मुलांना मोफत शिक्षणही देण्यात येणार असल्याचं,’ अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं आहे.
यासोबतच, ‘ज्यांच्या घरामध्ये कमावणारा एकच व्यक्ती असेल आणि त्याचाच कोरोनाने मृत्यू झाला तर त्यांनाही पेन्शन देण्यात येईल. दिल्लीत ज्यांच्याकडे कार्ड नाही, ज्यांना धान्याची गरज आहे त्यांनाही रेशन मिळेल. प्रत्येक गरजुला महिन्याला दहा किलो रेशन मिळेल,’ अशी दिलासादायक घोषणा देखील अरविंद केजरीवाल यांनी केल्यामुळे स्थलांतरितांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आज बाळासाहेब असते, तर कोकणची दुर्दशा पाहून…’; भाजपचं पुन्हा एकदा टीकास्त्र
- वरुडी येथे भरधाव जीप घुसली थेट पोलिसांच्या चेकपोस्टमध्ये; ३ पोलीस जखमी
- मलायका सोबतच्या अफेयरवर अर्जून कपुरने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाला…
- तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका; मुख्यमंत्र्यांनी दिला डॉक्टरांना ‘हा’ खास सल्ला