राज्यात आघाडीला २२ ते २३ जागा मिळतील, नाही मिळाल्यास ‘दाल में कुछ काला है’ : जयंत पाटील  

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशाला २३ मे ला लागणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. देशात कोण सत्ता स्थापन करणार याची उत्सुकता लागलेली आहे. प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या एक्झिट पोल नुसार देशात एनडीए सरासरी २७० ते २९० जागा मिळवणार तर कॉंग्रेस सरासरी ११० ते १३० जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचबरोबर महाराष्ट्रात महायुती सरासरी ३० ते 40 जागा तर कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरासरी  ७ ते १२ जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

याचदरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद  साधला. त्यावेळी, देशात मोदी लाट असताना एनडीएला ३०० जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे मोदी लाट नसताना एवढ्या जागा मिळणे अशक्‍य आहे. जनतेमध्ये  भाजपबाबत कमालीची नाराजी आहे. तीव्र विरोधही आहे. असे जयंत पाटील यांनी म्हंटले

याचबरोबर, राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला २२ ते २३ जागा मिळतील. आणि जर त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर  ‘दाल में कुछ काला है ‘ असे जनता नक्कीच म्हणेल,  आणि तो निकाल जनतेला पटणार नाही. असेही जयंत पाटील यांनी म्हंटले.