राज ठाकरेंच्या भाषणात आधी बाळासाहेब दिसायचे आता शरद पवार- आशिष शेलार

‘मोदीमुक्त भारत’ हे जरा जास्तच झाले, राज ठाकरेंनी आपला स्तर पाहून बोलावे

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवतीर्थावर जाहीर सभेत केलेल्या भाषणावर भाजप नेत्यांकडून टीकास्त्र सोडण्यात येत आहे. भाजप आमदार राम कदम यांनी ठाकरेंनी केलेल्या भाषणांची खिल्ली उडवली तर मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने ‘रोजगारमुक्त’ केलं, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ ची मुक्ताफळे उधळली आहेत, अशा शब्दात समाचार घेतला.

राज ठाकरे यांनी ”भारताला १९४७ साली पहिलं स्वातंत्र्य मिळालं, दुसरं स्वातंत्र्य १९७७ साली मिळालं आणि आता २०१९ साली भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. मोदीमुक्त भारत करा,” असे बोलून भाजपला लक्ष केले होते. दरम्यान आशिष शेलार म्हणाले,

‘मोदीमुक्त भारत’ हे जरा जास्तच झाले, राज ठाकरेंनी आपला स्तर पाहून बोलावे, विधानसभा ‘मनसेमुक्त’ झाली, मुंबई महापालिकेतील उरले-सुरलेले नगरसेवकही पळून गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आता यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, अशी टीका शेलारांनी राज ठाकरेंवर केली. तसेच, याआधी राज ठाकरेंच्या भाषणांवर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव दिसायचा, हल्ली शरद पवार यांचा प्रभाव दिसून येतो, असाही टोला लगावला.