शेवगाव गोळीबार प्रकरणी 49 शेतकरी आंदोलकांवर आरोपपत्र दाखल

अहमदनगर : ऊसाला 3 हजार 100 रूपये इतका भाव मिळावा यासाठी शेवगाव तालुक्यातील शेतक-यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान गोळीबार होऊन 2 शेतकरी गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी गृहराज्यमंत्र्यांसहीत अन्य नेत्यांनी शेतक-यांच्या विरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र गुन्हे मागे तर घेतले नाहीत उलट 14 ऐवजी 49 जणांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.त्यामुळे शेतक-यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीच्या वतीने 13 नोव्हेंबर(सोमवार) च्या सकाळपासूनच शेवगाव तालुक्यातील घोटण येथे रस्ता रोको आंदोलन सुरू केले होते.

सरकारने ऊस दराच्या प्रश्नात लक्ष घालावे,शेतक-यांच्या ऊसाला प्रति टन 3 हजार 100 रूपये इतका भाव मिळाला या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलक शेतक-यांनी बुधवारी (14 नोव्हेंबर) सकाळी ऊसाने भरलेली वाहने अडविण्यास सुरूवात केली. शेतकरी संघटनेचे नेते दादासाहेब टाकळकर,संदीप मोटकर,शुभम सोनावळे,दत्तात्रय फुंदे,संतोष गायकवाड,बाळासाहेब फटांगरे आदी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी आणखीनच उग्र रूप धारण केले.

शेतक-यांनी पैठण-शेवगाव रस्त्यावर घोटण,खानापूर,कर्हे टाकळी, एरंडगाव, कुडगाव आदी ठिकाणी रस्त्यावर टायर तसेच लाकडे जाळली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी प्रथम लाठीमार केला. त्यानंतर अश्रूधुराची नळकांडी फोडण्यात आली.

तरीदेखील आंदोलक शांत होत नसल्याने पोलिसांनी अखेरीस गोळीबार केला. यामध्ये 2 शेतकरी जखमी झाले.त्यांच्यावर नगरमधील एका खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान गोळीबाराच्या घटनेनंतर राज्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अहमदनगर मधील खासगी रूग्णालया त जखमी शेतक-यांची भेट घेतली.त्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत गृहराज्य मंत्री केसरकर यांनी शेतक-यांवरील गोळीबाराची घटना दुर्देवी असल्याचे सांगून शेवगाव गोळीबार प्रकरणाची दंडाधिकारी यांच्या मार्फत चौकशीचे आदेश दिले होते.

तसेच आंदोलक शेतक-यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन केसरकर यांनी दिले होते